नवी दिल्ली – जगातील पहिल्या १५ श्रीमंत शहरांमध्ये भारताची आर्थिक राजधानी ‘मुंबई’चाही समावेश आहे. मुंबईची एकूण संपत्ती ९५० अब्ज डॉलर्स (साधारण ६१ लाख कोटी रुपये) एवढी आहे. जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत ३ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे १९३ लाख कोटी) संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहे, न्यू यॉर्क शहर. ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ या संस्थेच्या अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

हा अहवाल तयार करताना, कोणत्याही शहराच्या एकूण संपत्तीत त्या शहरातील लोकांच्या वैयक्तिक कमाईचा समावेश केला गेला आहे. यात सरकारी निधी समाविष्ट करण्यात आलेला नाही. अब्जाधिशांच्या बाबतीतही, मुंबई जगातील १० शहरांपैकी एक असून मुंबईत एकूण २८ अब्जाधीश आहेत. या अहवालात मुंबईच्या संपत्तीचा उल्लेख करतानाच म्हटले आहे की, मुंबई भारताचे आर्थिक केंद्र आहे. याशिवाय या शहरातील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे जगातील सर्वात मोठ्या स्टॉक एक्सेंजच्या यादीत १२ व्या क्रमांकावर आहे. शहरात वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता आणि माध्यम समूहही आहेत.

श्रीमंत शहरांच्या यादीत न्यू यॉर्कनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, लंडन. त्यानंतर जपानची राजधानी टोकियो. चौथ्या क्रमांकावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को हे शहर आहे. या व्यतिरिक्त यादीत चीनची राजधानी बीजिंग, शांघाय, लॉस एंजेलिस, हाँगकाँग, सिडनी, सिंगापूर आणि शिकागो ही शहरंदेखील समाविष्ट आहेत. मागील १० वर्षांमध्ये संपत्तीच्या बाबतीत सर्वात जलद गतीने विकास होणाऱ्या शहरांमध्ये सॅन फ्रान्सिस्को, बीजिंग, शांघाय, मुंबई आणि सिडनी ही शहरं आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here