पुढील सहा वर्षांसाठी पाझारे, गायकवाड भाजपातून निलंबित
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर, 6 नोव्हेंबर
पक्षादेश न मानता विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवणार्या राज्यातील 40 नेत्यांची भारतीय जनता पार्टीने हकालपट्टी केली, त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रिजभुषण पाझारे व राजू गायकवाड यांचा समावेश आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून आपली उमदेवारी कायम ठेवून बंडखोरी करणार्या ब्रिजभुषण पाझारे यांना भाजपाने पक्षातून काढले आहे. किशोर जोरगेवार यांना भाजपाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही पाझारे यांनी आपले नामांकन मागे न घेता निवडणुकीत दंड धोपटले आहे. पाझारे हे 2000 पासून पक्षाचे कार्यकर्ता, नेता म्हणून कार्यरत होते. त्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सभापतीपदही भुषवले होते. तर वरोडा विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे सभापती राहिलेले राजू गायकवाड यांनीही भाजपाचे अधिकृत उमदेवार करण देवतळे यांच्याविरोधात उमदेवारी कायम ठेवली आहे.
जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, बंडखोरी करून भाजपा-महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविणार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट सूचना होत्या. मात्र, चंद्रपूर आणि वरोडा येथील भाजपा पदाधिकार्यांनी पक्षाचा आदेश ऐकला नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ब्रिजभूषण पाझारे, राजू गायकवाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. आपली बंडखोरी पक्षाच्या विरोधात असल्याने आपणास पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे, असेही पत्रात म्हटले आहे.