दिवाळी संपताच रायगडात भात कापणी ला वेग
आतापर्यंत 20 टक्क्याहून अधिक कामे पूर्ण
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: लांबलेल्या परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्यात भात कापणी उशिराने सुरू झाली. आठ दिवसांपूर्वी पावसाने विश्रांती घेतल्याने दिवाळीची लगबग संपताच शेतकरी वर्ग पुन्हा एकदा भात कापणीच्या कामात मग्न झाला आहे. आतापर्यंत 20 टक्क्याहून अधिक कापण्याची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या पंधरा दिवसात ही कामे पूर्ण होतील असे नियोजन शेतकरी करत आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये यंदा साधारण 98 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. सुवर्ण, कोलम ,रत्ना यासह नव्याने संशोधित झालेल्या संकरित वानांच्या बियाण्याची पेरणी झाली होती. सुरुवातीपासून समाधानकारक पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील हळव्या व गरव्यावाणाचे पीक वेळेत तयार झाले होते; परंतु पाऊस थांबण्यास तयार नव्हता. त्यामुळे भात कापणी लांबणीवर पडली होती. आठ दिवसांपासून कापणी सुरू झाल्यानंतर पूर्ण जोमाने कापणी केली जात आहे.
मागील पाच दिवसांपासून सर्वत्र दिवाळीचा उत्साह होता. त्यामुळे शेतकरी वर्ग ही दिवाळीच्या सणात गुंतला होता. दिवाळीचा फराळ घरी आलेल्या पाहुण्यांची उठ बस यातून महिलांकडेही वेळ नव्हता. आता दिवाळीचा सण संपताच शेतकरी शेतात तयार झालेले भात पीक घरी आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकरी सकाळी शेतावर जाऊन भात कापण्याची कामे करीत आहेत. आतापर्यंत दहा टक्के कापण्याची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रारी नोंदवल्या आहेत त्यांच्या पंचनामासाठी कापणी थांबलेली आहे. त्यामुळे पंचनामे लवकर पूर्ण करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.
‘कृषी विभागाने राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे. प्रत्यक्ष पंचनामे करताना या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना कापणी ची प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
*-वंदना शिंदे ,जिल्हा कृषी अधीक्षक, अलिबाग*
*3784 हेक्टर भात शेतीचे नुकसान*
लांबलेल्या परतीच्या पावसाने तयार झालेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केलेल्या आहेत. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाज पाहणीत 955 गावातील 10 हजार 591 शेतकऱ्यांचे 3 हजार 784 .70 हेक्टर क्षेत्रातील भात शेतीचे प्राथमिक नुकसान झाल्याचे वर्तवण्यात आलेले आहेत.