विकास प्रक्रिया अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी बहुमताने विजयी करावे : सुधीर मुनगंटीवार
📍प्रत्येकाने मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्याचे आवाहन
📍बल्लारपूर विधानसभा क्षेत्र देशातला सर्वाधिक विकसित मतदार संघ म्हणून विकसित करण्याची ग्वाही
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
बल्लारपूर : 18 नोव्हेंबर
गेली तीस वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. मतदार बंधू भगिनींच्या प्रेमाच्या व आशिर्वादाच्या बळावर गेली पंधरा वर्षे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व मी करत आहे. या मतदार संघाचा विकास व लोककल्याण हेच आपले ध्येय मानून मी कार्यरत आहे.नागरिकांनी नेहमीच माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यांच्या प्रेमाला मी कधीच उतराई होणार नाही. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपल्या एका मताच्या माध्यमातून आपल्या विभागाचा विकास, राज्यात लोकहित जपणारे सरकार स्थापन होणार आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकाने आवर्जून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांना केले आहे. विकास प्रक्रिया अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी बहुमताने विजयी करण्याची विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना केली आहे.
या आवाहन पत्रात सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणतात की 1999, 2004, 2009 या काळात मी विरोधी पक्षाचा आमदार होतो.राज्यात माझ्या पक्षाचे सरकार नव्हते तरी विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा वापर करत केवळ चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव नागपूर विद्यापीठाला देणे, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचे नाव अमरावती विद्यापीठाला देणे, सवित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देणे, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, मातंग समाजासाठी आयोग नेमणे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वारसाना नोकऱ्या, भिडेवाड्याची दुरुस्ती, संताजी जगनाडे महाराजांच्या तसेच क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकीट असे कितीतरी महत्वाचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडले. हे करताना मतदार संघाच्या विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही.
2014 ला राज्यात सत्ता बदल झाला. भाजपचे सरकार सत्तारुढ झाले. मी अर्थ व वनमंत्री झालो.राज्याच्या आर्थिक विकासात योगदान देण्याचा प्रयत्न मी केला.चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अभूतपूर्व असा निधी या काळात मी खेचून आणला. सैनिक शाळा, वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बॉटनीकल गार्डन, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, चिंचडोह प्रकल्प, कोटगल बॅरेज, पळसगाव आमडी सिंचन प्रकल्प, चिंचाळा व सहा गावांसाठी पाईप लाईन द्वारे सिंचन सुविधा, मौलझरी सिंचन प्रकल्प, रस्ते व पुलांची सर्वाधिक कामे,एसएनडिटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र अशी विकासाची मोठी मालिका मी तयार केली. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी,सिंचन,पायाभूत सुविधा या क्षेत्रात चौफेर विकास केला. अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबविले, सतत जनसेवा केली. विकासासंबंधी नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द प्रमाण मानून पूर्ण केला. बल्लारपूर विधानसभा मतदार संघ महाराष्ट्रच नव्हे तर देशातला सर्वाधिक मतदार संघ म्हणून लौकिक प्राप्त ठरेल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.