काँग्रेस व भाजपा नेत्यांवर गुन्हे दाखल

170
काँग्रेस व भाजपा नेत्यांवर गुन्हे दाखल

काँग्रेस व भाजपा नेत्यांवर गुन्हे दाखल

काँग्रेस व भाजपा नेत्यांवर गुन्हे दाखल
📍 कोसंबी येथील घटना

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 19 नोव्हेंबर
मूल पोलिस ठाणे हद्दीतील मौजा कोसंबी गावात 18 नोव्हेंबर रोजी काँगे्रस व भाजपाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भांडणाच्या पृष्ठभूमीवर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे मौजा कोसंबी गावातील नागरिकांशी गावाच्या समस्यांबाबत चर्चा करीत होते. त्यावेळी तेथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार संतोषसिंग रावत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आले. त्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून भ्रमणध्वनीद्वारे चित्रफिती तयार केली. तसेच संध्या गुरूनुले व तिथे असलेल्या नागरिकांना अश्लिल शिवीगाळ करून भांडण केले. या तक्रारीवरून मूल पोलिस ठाणे येथे कलम 296,189(2),191(2),190 अन्वये संतोषसिंह रावत, राकेश रत्नावार, बाबा अजीम, विजय चिमड्यालवार व इतरांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तसेच काँग्रेस पक्षाच्या तक्रारीनुसार, मुनगंटीवार हे कोसंबी येथे सभा घेत असल्याचे माहिती झाल्याने तक्रारदार संतोषसिंह रावत हे त्यांचे वाहनचालक राजू गावतुरे यांच्यासोबत कोसंबी येथे गेले आणि भ्रमणध्वनीद्वारे चित्रफिती तयार करू लागले. मुनगंटीवार यांनी चित्रीकरण का करीत आहात? यावरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार रावत यांनी दिल्याने पोलिस ठाणे मूल येथे कलम 115(2), 351 (2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पुढील तपास करीत आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे. याबाबत अफवा न पसरविण्याचे आणि निवडणूकसंबंधी कुठलीही तक्रार असल्यास संबंधित यंत्रणेला तात्काळ माहिती देण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक कार्यालयाने केले आहे.
======
ही दडपशाही, आतंकवाद भाजपा-महायुती सहन करणार नाही
⭕ सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा
नलेश्वर तलावाच्या संदर्भात बोलायचे असल्याने मी व कोसंबी गावातील माझे कार्यकर्ते तसेच काही गावकरी सहज बसून चर्चा करीत होतो. तेव्हा स्वतः काँग्रेस उमदेवार संतोष रावत तेथे काही लोकांना घेऊन आले. मी त्यांना म्हटले की, तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करा. मी कायद्याचा पदवीधर आहे. प्रचार संपल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करता येते आणि मी तेच करीत आहे. यावर बंदी नाही. कारण हा जाहीर प्रचार नाही. तरीही ते हटायला तयार नव्हते आणि नंतर त्यांनी धक्काबुक्की करायला सुरूवात केली. मला पोलिसांचे कवच असल्याने मला मारलेले धक्के कार्यकर्त्यांना लागले. गावकरी संतप्त झाले. कारण गुंडप्रवृत्तीचे लोक त्यांनी गावात आणले होते. खरे तर, माझ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांचे येणेच अयोग्य आहे हे सांगितल्यावरही त्यांनी अरेरावी केली. ही दडपशाही, आतंकवाद भाजपा-महायुती सहन करणार नाही, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
=======
⭕ काँग्रेस नेत्यांना अटक करा
📍भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांची मागणी
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गुंडगीरी खपवून घेणार नाही. पराभव दिसू लागल्यामुळे काँग्रेस गुंडगीरीवर उतरली आहे. त्यांच्या या गुंडगीरीला जनताच योग्य उत्तर देईल. त्यांनी मुनगंटीवार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कोसंबी गावातील नागरिक या घटनेचे साक्षीदार आहेत. आमच्या नेत्यांना जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. पोलिस प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी व हल्लेखोर काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करावी, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली आहे.