रायगड जिल्ह्यात पशुगणनेला सुरुवात
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्ह्यात २१व्या पशुगणनेला सोमवार (दि.२५) पासून सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी निवासस्थानातील गाय वर्गिय पशुंची गणना करीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सदर मोहिम २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, पशुंची गणना करण्यासाठी जिल्ह्यात १२९ प्रगणक, २७ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पशुसंवर्धन विभागाकडुन दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. जनगणनेच्या धर्तीवरच ही मोहीम राबवली जाते. मागील पशुगणना २०१९ मध्ये करण्यात आली होती. यंदाची पशुगणना २५ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. पशुगणना करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या मेहीमेत गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह यांच्यासह बदक, कुक्कुट या पक्षांची गणना केली जाणार आहे. पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होते. त्यानुसार शासनाकडून धोरण, योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते, शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे. त्यानुसार लसीकरणासाठी औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्याकडील पशुंची खरी माहिती पशुपालकांनी द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात २५ नोव्हेंबर रोजी पशुगणनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम उपस्थित होते.
………………………..
२० वी पशुगणना (सन २०१९) दृष्टीक्षेप….
गाय – १ लाख ७६ हजार ९०६
म्हैस – ६२ हजार २२५
मेंढी – २ हजार २०३
शेळी – ९० हजार १८८
डुक्कर – ५१३
बदक – १ हजार ४७२
कुक्कुट पक्षी – ४० लाख २४ हजार ५२३
………………….