पक्षाच्या शिकारप्रकरणी एकाला अटक
📍बल्लारपूर वनविभागाची कारवाई
📍वर्धा नदी पात्रातून पकडले पक्षी
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
विसापूर : 27 नोव्हेंबर
हिवाळ्याच्या दिवसात पक्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. असेच पक्षी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाजवळील वर्धा नदी पात्रात आहे. या पक्षांच्या अवैध शिकारप्रकरणी बल्लारपूर वनविभागाने एका आरोपीला अटक केली.
ही कारवाई सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास विसापूर फाटा येथे करण्यात आली. संजय दादाजी नान्हे (33, रा. विसापूर, ता. बल्लारपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
वाराबुकी हे पक्षी निसर्गातील महत्वाचा घटक आहे. हे पक्षी 40 मैल प्रती तास वेगाने उडतात. आरोपी या पक्षांची शिकार करून ग्राहकांना विक्री करीत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने सापळा रचला. पक्ष्यांची अवैधरित्या शिकार करून ग्राहकांना विकण्याच्या तयारीत असताना संजय नान्हे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता मृत पक्षी आढळून आले. आरोपीच्या घरी देखील जीवंत पक्षी असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून मृत व जीवंत पक्षी, पक्षी पकडण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरूध्द वन्य प्राणी (संरक्षण) अधिनियम 1972 च्या कलम 2, 9, 39, 44, 49 (बी), 50, 51 अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक वनसंरक्षक आदेश शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, पक्षी मित्र मुकेश भांदककर यांच्या उपस्थितीत क्षेत्र सहायक कोमल घुगलोत, वनरक्षक वर्षा पिपरे, सुधीर बोकडे, अनिल चौधरी, नितेश बावणे यांच्या पथकाने केली.