रायगडमध्ये तटकरे-थोरवे वादाचा दुसरा अंक

47
रायगडमध्ये तटकरे-थोरवे वादाचा दुसरा अंक

रायगडमध्ये तटकरे-थोरवे वादाचा दुसरा अंक

रायगडमध्ये तटकरे-थोरवे वादाचा दुसरा अंक

विधानसभा निवडणूकीपूर्वी कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. निवडणूक निकालानंतर ही वाद संपुष्टात येतील अशी आशा होती. परंतु
निकालानंतर दोघांमधील वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग : विधानसभा निवडणूकीपूर्वी कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. निवडणूक निकालानंतर ही वाद संपुष्टात येतील अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. निकालानंतर दोघांमधील वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. थोरवे यांनी आदिती तटकरे यांच्या मंत्रीमडळातील समावेशाला विरोध केल्याने, नव्या वादाला तोंड फूटले आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला होता. मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला गेला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुधाकर घारे यांनी बंडखोरी करत या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. निवडणूकी दरम्यान थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. तटकरे हे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना पाडण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला होता. कर्जत विधानसभा मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत महेंद्र थोरवे यांचा साडे पाच हजारांच्या मताधिक्याने विजय झाला.

निवडणूकीनंतर दोन्ही पक्षातील वाद मिटतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. थोरवे यांनी निवडून आल्यावर आदिती तटकरे यांचा मंत्री मंडळातील समावेश केला जाऊ नये अशी मागणी केली. रायगड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीच्या विरोधात काम करत शिवसेना आमदारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा थोरवे यांनी म्हटले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आदिती तटकरे यांनी थोरवे यांच्या टीकेला पहिल्यांदाच जाहीरपणे उत्तर दिले आहे. थोरवे काठावर वाचले आहेत. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा, विजयाची हवा डोक्यात जाऊ देऊ नये, आम्ही ८२ हजाराच्या मताधिक्याने निवडून आली. हे यश आम्ही नम्रतेने स्वीकारले. राज्यात कोणी कुठला मंत्री व्हायचे, ते आमच्या पक्षाचे नेते ठरवतील. स्थानिक आमदार ठरवत नसतात असे म्हणत आदिती यांनी थोरवे यांना सुनावले. जरा इथे तिथे झाले असते तर थोरवे यांना त्यांची जागा कळली असती असा टोलाही लगावला.

आदिती तटकरे यांच्या टीकेला थोरवे यांनी पुन्हा उत्तर दिले. मी काठावर पास झालेला आमदार नाही साडे पाच हजाराच्या मताधिक्याने निवडून आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनेक आमदार अत्यल्प मताधिक्याने निवडून आले आहेत. मतदारसंघात माझे मताधिक्य घटने हे तुमच्या वडीलांचे पाप आहे म्हणत आदिती तटकरेना प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीतनंतर रायगड जिल्ह्यात महायुतीच्या दोन घटक पक्षात वादाला तोंड फुटल्याचे दिसून येत आहे.