निवडणुकीत एसटी महामंडळाने कमवले 36 लाख
📍 दिवाळी अन् निवडणूक काळात चंद्रपूर विभागाची भरली तिजोरी
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 3 डिसेंबर
यंदा एसटी महामंडळाच्या चंद्रपूर विभागाची दिवाळी चांगली झाली. लक्ष्मी देवीच्या कृपेने केवळ 10 दिवसांत 8.30 लाख अंतर लालपरीने कापल्याने तब्बल 2 कोटी 61 लाख 16 हजारांचे उत्पन्न मिळाले होते. तर, अवघ्या 20 दिवसांनी असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने चंद्रपूर विभागाच्या तिजोरीत आणखी भर पडली. निवडणूक कर्तव्यावर लावलेल्या गाड्यांतून 36 लाखांचे उत्पन्न महामंडळाच्या खात्यात जमा होणार आहेत. या कालावधीत चंद्रपूर विभागातील 170 बसेस धावल्या.
विधानसभा निवडणुकीत राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागातील 170 बसेस निवडणूक काळात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी नोंदवल्या होत्या. सलग दोन दिवस या बसेस निवडणुकीच्या कामात वापरल्या गेल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान साहित्य, कर्मचारी यांना घेऊन जाणे, मतदान आटोपल्यानंतर साहित्य व कर्मचारी यांना सोडणे अशा कामी दोन दिवस चंद्रपूर विभागातील 170 बसेस रस्त्यावरून धावल्या. एका दिवसाचे तब्बल 18 लाख असे एकूण 36 लाखांचे उत्पन्न चंद्रपूर विभागाला झाल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागाचे विभाग नियंत्रक सुनिता सुतवाने यांनी दिली.
जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, चिमूर, वरोडा या चार आगारांचा समावेश होतो. तर ब्रह्मपुरी आगार हे गडचिरोली जिल्ह्यात येते. यंदाच्या दिवाळी हंगामात जिल्ह्यातील चारही विभागांत अतिरिक्त बसफेर्या सोडल्या होत्या. चंद्रपूरहून राज्याच्या कानाकोपर्यात, खास करून सर्व मोठ्या शहरांत जाण्यासाठी बसचा पर्याय उपलब्ध असल्याने 1 ते 10 नोव्हेंबर 2024 या 10 दिवसांच्या कालावधीत एसटी बसने 8 लाख 30 हजारांचे अंतर गाठले. यातून महामंडळाच्या चंद्रपूर विभागाला 2 कोटी 61 लाख 16 हजारांचे उत्पन्न मिळाले होते. दिवाळी व निवडणूक काळ लागोपाठ आल्याने चंद्रपूर विभागाच्या तिजोरीत वाढ झाली आहे.