अलिबाग तालुक्यातील बिटीशकालीन रेवस बंदर मोजतेय शेवटची घटका

अलिबाग तालुक्यातील बिटीशकालीन रेवस बंदर मोजतेय शेवटची घटका

अलिबाग तालुक्यातील बिटीशकालीन रेवस बंदर मोजतेय शेवटची घटका

गाळात रुतलेले बंदर, पाणीटंचाई, पाण्याअभावी शौचालयांत दुर्गधी,

मोटारसायकलचा बंदराला विळखा, विजेअभावी बंदरावर अंधाराचे साम्राज्य, रो-रो सवेचे काम मंदगतीने

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग : अलिबाग शहरापासून २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या बिटीशकालीन रेवस बंदराकडे मेरीटाईम बोर्डाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने हे बंदर आता अखेरची घटका मोजत आहे. या बंदराची झालेली जीर्ण अवस्था पहाता, कोणत्याही क्षणी दम तोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकेकाळी हे बंदर प्रवाशांनी आणि तेथे बसणाऱ्या स्थानिक फेरीवाल्यांनी गजबजेले असायचे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या बंदराकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह शासनाच्या मेरीटाईम बोर्डाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने या बंदरालावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मुंबईतील भाऊचा धक्का ते रेवस बंदर अशी सध्या लॉँचसेवा सुरु असून, रेवस – करंजा अशी तरसेवा आहे. लॉँचने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या मागे दहा रुपये, तर तरीने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशामागे तीन रुपये मेरीटाईम बोर्ड कर घेते. या कराबाबतचा विचार केल्यास आतापर्यंत करोडो रुपयांचा कर मेरीटाईम बोर्डाने वसूल केलेला असतानाही रेवस बंदराचा विकास का रखडला याबाबतचा सवाल प्रवाशी उपस्थित करीत आहेत.

या बंदराच्या पाठोपाठ अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदराचा विकास मेरीटाईम बोर्डाने झपाट्याने केला. मात्र रेवस बंदराकडे मेरीटाईम बार्डाने फारसे लक्ष दिले नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. दरवर्षाला या बंदरावरून आठ ते दहा हजार प्रवाशी प्रवास करायचे. मात्र गाळाने भरलेला रेवस बंदर, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव, मेरीटाईम बोर्डाचे या बंदराकडे झालेल्या दुर्लक्षेचा विचार करता, या बंदरावरील प्रवाशांची संख्या झपाट्याने घटल्याने त्याचा फटका या बंदारावरील उपहारगृहांसह शेवाग्याच्या शेंगा, काजू, आवळे, स्थानिक चिक्की, खाडीची मासळी, सफेद जांभ, बोरे, कैऱ्या, मोठे आवळे. चिंचा विकणाऱ्यांना बसल्याने या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यामते रेवस बंदराचा विकास झाल्यास आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला असता; परंतू राज्य शासन, जिल्हा प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मेरीटाईम बोर्डाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोपही या व्यावसायिकांनी केला आहे.

…………………………..

रेवस बंदरावर पाणीटंचाई

…………………..

या बंदरावर पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी

टाकलेली आहे. मात्र या जलवाहिनीतून पिण्याचे पाणीच येत नसल्याने या बंदरावर पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. दुसरीकडे पाणी नसल्याने शौचालयेही धुतली जात नसल्याने या शौचालयांच्या परिसरात दुर्गधी सुटलेली आहे. मेरीटाईम बोर्डाच्या म्हणण्यानुसार बंदरावर अधुनमधून पाण्याचे टँकर आणले जात असल्याचे सांगण्यात आले.

…………

गाळात रुतले रेवस बंदर

…………

रेवस बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने मुंबईहून येणारी लाँच रेवस बंदराला
वेळेत लागत नाही. त्याचा फटका मोठ्या प्रमाणात प्रवाशांना बसत असतो. त्यामुळे
प्रवाशी रेवस बंदराकडे येण्याचे टाळत असून, ते गेटवे ऑफ इंडिया येथून लाँचने मांडवा बंदराकडे येत असतात. त्यामुळे रेवस बंदरावरील दिवसेंदिवस प्रवाशी संख्या घटत चित्र आहे. ऑल इंडिया पॅसेंजर असोसिएशनने याला पर्याय म्हणून रेवस बंदराचा उत्तरेकडे
विस्तार करण्याबाबत राज्य शासनासह मेरीटाईम बोर्डाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला; परंतू त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने दरवर्षी रेवस बंदरातील गाळ उपसण्यासाठी कोट्य़वधींचा खर्च होत असतो. रेवस बंदराचा विस्तार झाला असता, तर गाळ उपसण्यासाठी दरवर्षी होणारा कोट्यवधींचा खर्च वाचला असता, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकात मोकल यांनी दिली 

रो-रोसेवेचे मंदगतीने काम काम

उरण तालुक्यातील करंजा ते रेवस बंदर या दरम्यान सध्या तरीने प्रवाशी प्रवास करीत असले, तरी भविष्यात या मार्गावर रो-रो सेवा सुरु होणार आहे. मात्र या रो-रो सेवेचे काम मंदगतीने सुरु असल्याने या कामाला कितीसा काळ जाईल हे सांगणे कठीण आहे. जानेवारी २०२२ मध्ये या रो-रो सेवेचा शुभारंभ होणार होता. मात्र हे काम पूर्णत्वास न गेल्याने या सेवाचा शुभारंभ लांबला आहे.

प्रवाशांना बसण्यासाठी
शेडसह खुर्च्या नाहीत

मुंबईहून लाँच रेवस बंदरावर लागण्यापूर्वी प्रवाशांना बसण्यासाठी बंदरावर बसण्यासाठी शेडसह लाकडी खुर्च्यांची सोय होती. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली मेरीटाईम बोर्डाने बंदरावरील शेडचे
काम जमीनदोस्त करीत लाकडी खुर्च्याही हटविल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून,
प्रवाशांना ऊन्हात उभे राहावे लागत आहे. बंदरावर पूर्वी प्रवाशांसाठी विश्रामगृह होते. आता तेही नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर बंदरावर अनधिकृतपणे मोटार सायकलसाठी पार्किगमुळे प्रवाशांना त्याचा त्रास होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला असून, मेरीटाईम बोर्डाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांची आहे.

बंदरावरील तिकीट खिडकी शेडचीही दुरावस्था झाल्याने ही शेड कधी कोसळेल याची
शाश्वती नसल्याचे बंदरावरील नागरिकांनी सांगितले 

बंदरांवर दिवे असुनही
रात्रीच्या वेळी असतो अंधार

रेवस बंदरावर पुरेशा प्रकाशासाठी मर्क्युरी दिव्यांची सोय करण्यात आलेली आहे. मात्र हे दिवे काही कारणांमुळे नियमीत लागत नसल्याने रात्रीच्या वेळी बंदरावर पसरलेल्या अंधारात
प्रवाशांना धडपडच एस.टी. किंवा रिक्षा पकडण्यास धावावे लागते. तरी नियमीत दिवे कसे पेटतील याकडे मेरीटाईम बोर्डाने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.
दरम्यान, मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी श्री. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता,
रेवस बंदराच्या विकासाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला असून, या प्रस्तावाला मंजुरी मिळताच रेवस बंदरावरील विकासाच्या कामांना सुरवात होणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here