भिवंडीत अग्नितांडव, कपिल रेयॉन इंडिया कंपनीला भीषण आग.
नीलम खरात
भिवंडी:- शहरात दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असून आज पुन्हा शहरात अग्नितांडव पाहयला मिळाला आहे. भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत कंपनीतील महागड्या मशीन्स, कापड जळून खाक झाल्याने कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. रात्री दोन ते अडीचच्या सुमारास या कंपनीत आग लागली. त्यावेळी या कंपनीत असलेले 30 ते 40 कामगार वेळेत बाहेर पडल्याने त्यांचा जीव बचावला. कंपनीच्या दोन मजली इमारतीमध्ये सगळीकडे आग पसरली आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
ही कंपनी ग्राऊंड प्लस अशी दोन मजली आहे. आग लागल्याची माहिती समजताच भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तत्काळ रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे ठाणे, कल्याण डोंबिवली येथील अग्निशमक दलालाही पाचारण करण्यात आले आहे. पाण्याची कमतरता भासत असल्याने अंबरनाथ, उल्हासनगर महापालिकेच्याही तीन अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये ही आग संपूर्ण दोन मजल्यांपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट दिसत आहे. कंपनीत कापडाचा साठा असल्याने या आगीने लगेच रौद्र रुप धारण केले. त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाल्याचे दिसत आहे. परंतु आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.