मीडिया वार्ता न्यूज़

मुंबई : मराठी सिनेमाला ऑस्कर मिळायला हवे, हे तमाम मराठी सिनेमाप्रेमींनी उराशी बाळगलेले स्वप्न आहे. ते पूर्ण होईल तेव्हा होईल, पण एका मराठी माणसाला ऑस्कर मिळणे हे आता स्वप्न राहिलेले नाही. विकास साठ्ये या मुंबईच्या अभियंत्याने तांत्रिक विभागांसाठी देण्यात येणाऱ्या ‘ऑस्कर’वर आपले नाव कोरले आहे.

कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्स येथे तेथील स्थानिक वेळेनुसार शनिवारी सायंटिफिक अँड टेक्निकल ऑस्कर २०१८ ऑस्कर सोहळा रंगला. या देण्यात आलेल्या कॅमेरा तंत्र पुरस्कारांमध्ये चार जणांच्या चमूची निवड झाली. ‘शॉटोव्हर K1 कॅमेरा सिस्टीम’ तंत्राचा सिनेमात यशस्वी वापर केल्याबद्दल या चौघांना ऑस्कर मिळाले आहे. या चौघांपैकी एक असणाऱ्या विकास साठ्ये यांनी हे कॅमेरा तंत्र विकसित केले आहे.

साठ्येंनी आपलं मनोगत मांडताना म्हटलंय, ‘२००९ मध्ये मी न्यूझिलंडमधील क्वीनस्टोन भागातली शॉटोव्हर कॅमेरा सिस्टीम ही नवी कंपनी जॉइन केली. त्यात ‘एरिअल माउंट’ प्रकारावर काम केले. क्वीनस्टोनचं निसर्गसौंदर्य अनेक सिनेनिर्मात्यांना-दिग्दर्शकांना भुरळ पाडतं. हेही कारण ही कंपनी येथे सुरु करण्यामागे होतं.’

तंत्राबद्दल ते म्हणतात, ‘हेलिकॉप्टरच्या बेसला हा कॅमेरा बसवतात. या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे उंचावरील हवेमुळे येणारे अडथळे, त्यामुळे निर्माण होणारी कंपनं दूर ठेवून, जसं जमिनीवर स्थिरपणे होईल, तसंच चित्रण या कॅमेऱ्यात होतं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कॅमेरा ऑपरेटरशिवाय आपोआप हव्या त्या अँगलला वळवता येतो. हेलिकॉप्टरमध्ये बसलेला ऑपरेटर जॉयस्टिकद्वारे कॅमेऱ्यावर नियंत्रण ठेवतो. अशा पद्धतीने ३डी एरिअल फिल्मिंग या कॅमेऱ्याद्वारे यशस्वीपणे करता येतं.’ विकास साठ्ये हे मुळचे पुण्याचे आहेत. १९६७ मध्ये त्यांचा जन्म पुण्यात झाला, मात्र ते मुंबईतच लहानाचे मोठे झाले. ठाण्याच्या व्ही.पी.एम. पॉलिटेक्निकमधून त्यांनी इन्स्ट्रूमेंटेशनचा डिप्लोमा केला. पुढे पुण्याच्या व्हीआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्समधून बीई आणि IISc मधून इन्स्ट्रूमेंटेशन विषयातून एम.टेक्. केलं. त्यांनी पुढे पुण्याच्या क्युमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या मुलींच्या कॉलेजमध्ये ७ वर्षे प्राध्यापक म्हणूनही काम केलं. तिथून त्यांना एका प्रकल्पासाठी तीन महिने इटलीला पाठवण्यात आलं. या अनुभवानेच त्यांना सॉफ्टवेअर तंत्रात संशोधन करण्याची प्रेरणा दिली.
वॉर फॉर द प्लॅनेट ऑफ द एप्स, द फेथ ऑफ दि फ्युरियस, पायरेट्स ऑफ द कॅरेबियन: डेड मेन टेल नो टेल्स, डंकर्क, स्पायडरमॅन: होमकमिंग, ट्रान्सफॉर्मर्स : द लास्ट नाइट यासारख्या अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये शॉटोव्हर K1 कॅमेरा तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here