रांजणखार ग्रामस्थांच्या आक्रमतेपुढे प्रशासन नमले
कैवल्यधाम संस्थेच्या विरोधात रांजणकर ग्रामस्थांचा एल्गार
विश्वासात न घेता केलेली शासकीय मोजणी थांबविली
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :आमचा ताबा, आमची मालकी, कैवल्यधाम चले जाव अशा घोषणा देत बुधवारी सकाळी रांजणखारमधील ग्रामस्थांनी मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला. एक हजारहून अधिक ग्रामस्थ, महिला या आंदोलनात सहभागी झाले होते. अखेर पोयनाड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कल्पेश नलावडे, राकेश मेहत्तर यांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाले. अखेर मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांनी मोजणी थांबविली. सर्वांना नोटीस देऊनच मोजणी करा अशी मागणी ग्रामस्थांनी करीत आमच्या जमीनीचा ताबा घेऊन देणार नाही, हा लढा शेवटपर्यंत लढत राहणार असा इशारा ही देण्यात आला.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार,ग्रामस्थ मंडळ रांजणखार यांच्या ताबे कब्जात आणि वहिवाटीखाली असलेली एकूण 30 एकर जागेची सातबारा दप्तरी सन 1930 सालापासून नोंद होती. मात्र 1941 साली बिवलकर यांनी लोळावला येथील कैवल्य धाम संस्थेला या जागेपैकी 10 एकर जागा 99 वर्षाच्या कराराने दिली होती. त्या ठिकाणी योगआश्रम, गोशाळा, महिलांसाठी शाळा तसेच स्थानिक नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्याकरिता देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत तेथे काहीही करण्यात आले नाही. त्यावेळी ग्रामस्थांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन कुळ कायद्यातील तरतुदीनुसार त्या वेळच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन 10 एकर ऐवजी 15 एकर जमीन घेऊन त्याचा सातबारा उतारा बनवून ग्रामस्थांची फसवणूक केली. 1988 साली ग्रामस्थ मंडळातर्फे गावातील ग्रामस्थांना घरे बांधण्यासाठी प्लॉट वाटप केले आहेत. 2005 पासून या जागेचा वाद न्यायालयात चालू आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात या जागेच्या दाव्याची सुनावणी झालेली आहे.
या वादग्रस्त जागेमध्ये ग्रामस्थांनी राहण्यासाठी घरांचे बांधकाम केले आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते त्याठिकाणी राहत आहेत. दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी कोर्ट कमिशन मोजणी करण्यात येणार आहे अशी नोटीस देण्यात आली होती. मोजणी झाल्यास ग्रामस्थांच्या ताबेकब्जास आणि वहिवाटीस भविष्यात बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोजणी करताना संबंधित घरमालकांना तसेच न्यायालयात ज्यांच्या नावावर दावा दाखल आहे. चारही पंचांना तसेच शेजारी असलेल्या सर्व खातेदारांना नोटीस देणे आवश्यक असताना फक्त मोजक्यास मंडळींना नोटीस बजावण्यात आली. ही मोजणी ग्रामस्थांना विश्वासात न घेता बुधवारी सकाळी सुरु केल्याने रांजणखार येथील ग्रामस्थ व महिलांनी एकत्र येत या मोजणीला विरोध केला. संतत्प जमावाने कैवल्य धाम संस्थेच्या भुमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. आमचा ताबा, आमची मालकी, कैवल्यधाम चले जाव अशा घोषणा देत मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर पोयनाड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कल्पेश नलावडे, राकेश मेहत्तर यांनी घटनास्थळी धाव घेऊन तणावाचे वातावरण शांत केले. पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाले.अखेर मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांनी मोजणी थांबविली. याबाबत वैकल्यधामच्या देखरेखीचे काम करणारे शर्मा यांच्याशी संपर्क साधला, असता होऊ शकला नाही.
–—
गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांच्या वहिवाटीची जागा आहे. नारायण गणू आणि ग्रामस्थ मंडळ पाच, पंच अशी सातबारा दप्तरी नोंद आहे. क्षेत्र 30 एकरचे असून 1941 पर्यंत पांडू गोमा पाटील रांजणखार, ग्रामस्थ मंडळ अशी नोंद आहे. परंतु विनायक बिवलकर यांनी कैवल्यधाम संस्थेने संगनमताने 99 वर्षाचा करार पुण्यामध्ये बसून केला आहे. अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांनी जमीन बळकविल्याचा आरोप आहे. ग्रामस्थांना विश्वात न घेता हा परस्पराने संगनमताने व्यवहार केला आहे. याला आमचा विरोध आहे. गेली वीस वर्षे ग्रामस्थ लढा देत आहे. जोपर्यंत निर्णय लागत नाही. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची मोजणी करू नये. शासनासह स्थानिक आमदार, खासदारांनी ग्रामस्थांनी न्याय द्यावा अशी मागणी आहे.
संजय म्हात्रे – ग्रामस्थ
––—