*आरसीएफतर्फे मच्छीमार महिलांना शितपेट्या वाटप*
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९८३
अलिबाग : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) निमिटेड, थळ तर्फे निगमित सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत कारखाना परिसरातील थळ मच्छीमार महिलांना शीतपेट्यांचे वाटप करण्यात आले. कारखान्यालगतच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात आयोजित एका कार्यक्रमात कार्यकारी संचालक (थळ) नितिन हिरडे आणि महाव्यवस्थापक संजीव हरळीकर यांच्या शुभहस्ते हे वाटप करण्यात आले.
थळ कारखाना परिसरातील थळ मच्छीमार सहकारी सो. लि आणि नवेदार नवगाव बोरेश्वर सर्वोदय सहकारी सो. लि यांच्या कडून प्राप्त विनंती पत्रांनुसार सुमारे 1000 मच्छीमार महिलांना मासे व्यवसायासाठी शितपेट्यांची आवश्यकता असून आरसीएफ च्या सीएसआर अंतर्गत त्या देण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आरसीएफ व्यवस्थापनातर्फे मासे व्यवसायासाठी पूरक अशा 1000 शितपेट्यां उपलब्ध करून देण्यात आल्या. आजकाल महिलांसाठी अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषतः मच्छिमारीसारख्या कठीण आणि श्रमसाध्य व्यवसायात आपले स्थान सिद्ध करणे हे एक मोठे आव्हान ठरते. महिला मच्छिमार अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत, त्यांचं काम करत असतात, आणि त्यांना त्यांचं उत्पादन ताजं आणि सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य उपकरणांची आवश्यकता असते. या दृष्टीने महिला मच्छिमारांच्या व्यवसायातील उत्पादकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनशैलीला सुधारण्यासाठी आरसीएफद्वारा सीएसआर उपक्रमांअंतर्गत शीतपेट्यांचे वितरण करण्यात आले.
सीएसआरच्या माध्यमातून सामाजिक दृष्टीकोन ठेवत समाजाच्या विविध घटकांना मदत करण्यासाठी आरसीएफ सातत्याने प्रयत्नशील आहे. महिला सशक्तीकरणासाठी आणि त्यांना यशस्वी जीवन जगण्यासाठी आरसीएफने आपली भूमिका प्रगल्भपणे पार केली आहे. आपल्याला विश्वास आहे की या शीतपेटीमुळे या महिला मच्छिमारांच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण बदल घडेल आणि ते अधिक आत्मविश्वासी होऊन आपला व्यवसाय आणि कुटुंब चालवू शकतील असे प्रतिपादन कार्यकारी संचालक (थळ) नितिन हिरडे यांनी या वेळेस केले. याचबरोबर महाव्यवस्थापक संजीव हरळीकर यांनी सद्य परिस्थितीत महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचे महत्व विशद करून सीएसआरच्या माध्यमातून कारखाना परिसरात विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातील याची ग्वाही दिली.
या प्रसंगी उपमहाव्यवस्थापक (मानव संपदा प्रशासन) विनायक पाटील, उपमहाव्यवस्थापक (ईटीपी) उदय चव्हाण, मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक महेश पाटील, कॉर्पोरेट सीएसआर सल्लागार धनंजय खामकर, वरिष्ठ व्यवस्थापक सीएसआर हर्षला शिंदे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी (थळ) संतोष वझे, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी (थळ) राकेश कवळे यांसह मच्छीमार सोसायट्यांचे पदाधिकारी व लाभार्थी मच्छीमार महिला उपस्थित होते.