भत्त्यापासून अंगणवाडी सेविका वंचित

43
भत्त्यापासून अंगणवाडी सेविका वंचित

भत्त्यापासून अंगणवाडी सेविका वंचित

भत्त्यापासून अंगणवाडी सेविका वंचित

एक कोटी 35 लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा; शासन स्तरावर प्रस्ताव
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहा महिन्यांपूर्वी सुरु केली. या योजनेच्या अंमलबजावणीत अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. प्रत्येक अर्जामागे त्यांना शासनाकडून 50 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता. परंतु, लाडक्या बहिणींसाठी राबणार्‍या अंगणवाडी सेविका मात्र भत्त्यापासून वंचित राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. या सेविकांना भत्त्याची प्रतीक्षा लागून राहिली असून, शासनाकडून सुमारे एक कोटी 35 लाख रुपयांचा निधी येणे अपेक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने जुलैमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेला रायगड जिल्ह्यातील बहिणींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. आपली नियमित कामे अटोपून ग्रामीण भागातील महिलांचे या योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करीत होत्या. अनेकवेळा इंटरनेटची समस्या भेडसावत होत्या. शासनाने दिलेल्या पोर्टलवर तो अर्ज भरताना तारेवरची कसरत करावी लागत होती. रात्रीचा दिवस करून अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेतले. ही जबाबदारी त्यांनी खंबीरपणे पार पाडली. घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी योजनेचे अर्ज भरले. त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते.

रायगड जिल्ह्यामध्ये सहा लाखांंहून अधिक महिलांनी या योजेनचे अर्ज भरले होते. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील २ हजार ८२४ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी २ लाख ७०हजार महिलांचे ऑनलाईन अर्ज भरले. या योजनेची अंमलबजावणी सक्षमपणे पार पाडणार्‍या अंगणवाडी सेविका मात्र उपेक्षितच राहिल्याचे चित्र आहे. त्यांना अजूनपर्यंत शासनाकडून प्रोत्साहनपर भत्ता मिळाला नाही. एक कोटी ३५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून येणे बाकी आहे. त्यामुळे ही भत्त्याची रक्कम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणे अपेक्षित आहे. या रकमेची प्रतीक्षा अंगणवाडी सेविकांना लागून राहिली आहे.

रायगड जिल्ह्यातील २ हजार ८२४ अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेसाठी २लाख ७० हजार ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी शासनाकडून यादी मागविण्यात आली होती. तो अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे. निधी प्राप्त झाल्यावर अंगणवाडी सेविकांना भत्ता दिला जाईल.

– निर्मला कुचिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालविकास विभाग, रायगड जिल्हा परिषद