रायगडचे किनारे हाऊसफुल्ल

56
रायगडचे किनारे हाऊसफुल्ल

रायगडचे किनारे हाऊसफुल्ल

रायगडचे किनारे हाऊसफुल्ल

नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक दाखल

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: नाताळची सुट्टी, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचे सेलिब्रेशन यामुळे मुंबई-पुण्यापासून जवळचं पर्यटनस्थळ असलेले रायगडचे किनारे पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेले आहेत. मौज-मस्ती आणि सोबतीला साग्रसंगीताची मजा अनुभवण्यासाठी समुद्रकिनार्‍यांना अधिकची पसंती दिली जात आहे, त्यामुळेच रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणारी शहरे आणि गावे पर्यटकांच्या गर्दीमध्ये चांगलीच न्हाऊन निघाली आहेत. येथील विविध हॉटेल्स, रेस्टारंट, रिसार्ट आणि कॉटेजेस हाउसफुल्ल झाली आहेत.

बुधवारी साजरा केल्या जाणार्‍या सेलिब्रेशनसाठी शनिवार आणि रविवारीच पर्यटक दाखल झाल्याने न्यू इयर पार्ट्यांना चांगलीच रंगत येणार असल्याचे दिसून येते. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, माथेरान अशा विविध ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी केली आहे. नवीन वर्षाच्या मध्यरात्री ठाणे-बेलापूर रोड, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच रोडवर चक्काजाम होत असते. वाहतूककोंडी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांनी सर्व प्रमुख रस्त्यांवर बंदोबस्त वाढविला असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दि. 28 व 29 रोजी जड-अवजड वाहनांना बंदी घातली आहे. मद्यपान करून वाहने चालविणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे. हॉटेल्समध्ये साध्या वेशातील पोलीसही पाळत ठेवणार असल्याचे ते म्हणाले. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणार्‍यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रायगडात येणार्‍या पर्यटकांनी मद्यपानाऐवजी सहकुटुंब नवीन वर्षाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक पोलीस तैनात
मुंबई, पुणे तसेच राज्यातून येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांची संख्या पाहता मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. वडखळ ते अलिबाग, इंदापूर, माणगाव ही वाहतूककोंडीची ठिकाणे आहेत, त्यामुळे या ठिकाणांसह शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
किनार्‍यावर मनोरंजनाची साधने
अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी फुलले आहेत. त्यांच्या दिमतीला पॅरासिलिंग, बनाना राइड, स्कुबा ड्रायव्हिंग, जेटस्की, स्पीड बोट, घोडे-उंट याची सफर अशा विविध मनोरंजनाची साधने तैनात करण्यात आली आहेत. समुद्रकिनारी समुद्र सफरीचा आनंद लुटणार्‍या पर्यटकांसाठी सक्तीने लाइफ जॅकेट संबंधित व्यावसायिकाने पुरवणे जिल्हा प्रशासनाने बंधनकारक केले आहे, त्यामुळे लाइफ जॅकेट घातल्याशिवाय पर्यटकांना बोटीतून फिरता येणार नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या बोट दुर्घटनेमुळे प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. म्हणूनच प्रशासनाने याबाबत मेरीटाइम बोर्डाला तसे सक्त आदेश दिले आहेत.
खवय्यांची चंगळ
खवय्यांसाठी कोकणी, गोमंतक, आगरी, कोळी अशा पदार्थांची मेजवानी दिली जाणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध हॉटेल, रेस्टारंटच्या व्यवस्थापनाने डिजे नाइट पार्टीचे आयोजन केले आहे. यासाठी विविध पॅकेजच त्यांनी पर्यटकांना देऊ केली आहेत. त्यामध्ये खाणे-पिणे, नाचगाणी यांचा समावेश आहे.
महिनाभर आधीच पर्यटकांनी रुम्सची बुकिंग केली आहे. चांगल्या वातावरणामुळे पर्यटकांचा ओढा अलिबागकडे अधिक आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आले आहेत. येणार्‍या पर्यटकांची चांगली बडदास्त राखली जावी यावर अधिक भर देण्यात येईल.

– मनोज घरत
कॉटेज व्यावसायिक, थळ