182 मद्यपी चालकांवर चंद्रपूर वाहतूक पोलिसांची कारवाई
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 31 डिसेंबर
सायलेंसरने फटाक्यासारख्या आवाज काढणार्या तसेच मद्यपी वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांनी जिल्हाभरात 182 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे.
अतिउत्साही तरुण मंडळींकडून येत्या 31 डिसेंबर 2024 रोजी वर्ष समाप्ती व नववर्षाच्या स्वागताप्रसंगी मद्यप्राशन करून वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, असे प्रकार निदर्शनास येतात. यावर आळा घालण्यासाठी अशा वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या नेतृत्वात शहरात विशेष मोहीम राबविली जात आहे. सोमवार व मंगळवारी राबविण्यात येणार्या मोहिमेदरम्यान सायलेन्सरने आवाज काढत वाहन चालविणार्या सुमारे 17 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. दुचाकीवर तिघे जण प्रवास करणार्या 230 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन, भरधाव वेग आणि बेशिस्त वर्तनाचे प्रकार वाढले होते. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र, वाहतूक विभागाच्या या कारवाई बेशिस्त वाहनधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वाहनांचे सायलेन्सर बदलून फटाक्यांचा आवाज सोडणार्या वाहनांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.