शेतकर्यांच्या समृद्धीमध्येच देशाच्या प्रगतीचा मार्ग
• आ. सुधीर मुनगंटीवार यांचे कृषी महोत्सवात प्रतिपादन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 31 डिसेंबर
शेतकर्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचविण्याची आवश्यकता आहे. मी महाराष्ट्राच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष झालो, तेव्हा त्यात ‘मिशन जय किसान’चा समावेश केला. शेतकर्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य प्रस्थापित होऊ शकत नाही. कारण शेतकर्यांच्या समृद्धीमध्येच देशाच्या प्रगतीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
धनोजे कुणबी समाज मध्यवर्ती समिती पुरस्कृत धनोजे कुणबी समाज मंदिराद्वारे आयोजित भव्य कृषी महोत्सव सोबतच सरपंच मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चांदा क्लब मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला आ. देवराव भोंगळे, आ. करण देवतळे, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते, सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कराळे, कृषी महोत्सव समितीचे प्रमुख श्रीधर मालेकर, भाजप महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, मनोहर पाऊणकर आदींची उपस्थिती होती.
शेतीचे सरासरी क्षेत्र कमी होणे चिंतेची बाब आहे. 1970-71 मध्ये 49 लक्ष 51 हजार शेतकरी होते. आज 1 कोटी 52 लक्ष 85 हजार शेतकरी आहेत. शेती क्षेत्र तेवढेच आहे, शेतकर्यांची संख्या वाढली. पूर्वी 4.21 हेक्टर सरासरी जमीन होती, आता 1.31 हेक्टर आहे. आता शेतीचे तंत्रज्ञान बदलले नाही, तर शेतीचे मोठे नुकसान होईल. शेतकर्यांच्या हक्कासाठी मी विधानसभेत लढत राहणार आहे. कर्जमुक्तीचा विषय असो किंवा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याची योजना असो, प्रत्येक बाबतीत पाठपुरावा करणार आहे, असा शब्दही आ. मुनगंटीवार यांनी दिला.
📍सरपंच हा गावाचा मुख्यमंत्रीच
सरपंच मेळाव्यासारख्या कार्यक्रमांतून संवाद होतो, चर्चा होते आणि त्यातून समाधानाकडे जाता येते. चौदा कोटी लोकसंख्येत 27 हजाराच्या आसपास सरपंच असतात. त्यामुळे सरपंच हा गावाचा मुख्यमंत्रीच असतो. पण पदाचा किती आणि कसा उपयोग करायचा, हे आपल्यालाच ठरवायचे असते. सरपंच पद किती कालावधीचे आहे, हे महत्त्वाचे नाही. आपल्या कामाला आपण किती न्याय देतो हे महत्त्वाचे आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.