कर्जत-खालापूर तालुक्यात पत्रकार भवन उभारणार? आमदार महेंद्र थोरवे
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333
कर्जत :- आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त कर्जत-खालापूर मतदारसंघातील पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न. ६ जानेवारी हा पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांच्या “दर्पण” या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या प्रकाशनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. याचे औचित्य साधून कर्जत येथील बाळासाहेब भवनमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने कर्जत-खालापूर मतदारसंघातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, ते सत्याची कास धरून समाजहितासाठी कार्यरत असतात. बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ च्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. त्यांच्या प्रेरणेतून आजही पत्रकारितेला नवी दिशा मिळते.
पत्रकारांनी आपल्या लेखणीने आणि निर्भय पत्रकारितेने समाजातील अडचणींवर प्रकाश टाकावा. पु. ल. देशपांडे यांच्या उदाहरणाचा उल्लेख करताना मला नेहमीच जाणवते की, पत्रकारांनी मांजरासारखे असावे—जाणकार, प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहणारे आणि तोंड खूपसून सत्याचा शोध घेणारे. अशा पत्रकारितेची आज देशाला गरज आहे. तसेच येणाऱ्या काळात कर्जत आणि खालापूर तालुक्यांमध्ये आधुनिक पत्रकार भवन उभारण्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या भवनामुळे पत्रकार बांधवांना त्यांच्या कार्यासाठी योग्य जागा मिळेल आणि सर्व राजकीय पक्ष, संघटना यांना पत्रकार परिषदा आयोजित करणे सोपे होईल. कुणाच्या घरात नव्हे, तर या भवनातच सर्व परिषदा होऊ शकतील.
पत्रकार बांधवांनी आज मांडलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू. पत्रकारांसाठी मानधन, आरोग्य विमा, आणि आरक्षित भूखंडांवर घरे उभारण्या संदर्भातील मागण्या साकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे या कार्यक्रम प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे बोलले तसेच भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी निर्भीड पत्रकारितेचे आवाहन या प्रसंगी त्यांनी केले. बाळशास्त्री जांभेकर यांची प्रेरणा घेऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला बळकट करणारी पावले उचलावीत.
या कार्यक्रम प्रसंगी पत्रकारांच्या वतीने दोन वेळा आमदार झाल्याबाबत महेंद्र थोरवे यांचाही सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व पत्रकार बांधव, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.