आमडी-खुरसापार नाल्याजवळ अस्वलाचा मृत्यू
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चिमूर : 9 जानेवारी
खडसंगी बिटातील आमडी- खुरसापार नाल्याजवळील शेतशिवारात अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ही अस्वल साडेतीन ते चार वर्षांची असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रादेशिक वन विभागअंतर्गत येणार्या आमडी-खुरसापार नाल्याजवळील शेतशिवारात बुधवारी सकाळी आमडी येथील शेतकरी शेतात गेले असता त्यांना अस्वल मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती शेतकर्यांनी खडसंगी येथील वनविभागाचे क्षेत्र सहायक यु. बी. घुगरे यांना दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृत अस्वलाला खडसंगी येथील विश्रामगृहात आणून चिमूर, शंकरपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी साईली देशमुख यांनी अस्वलाचे शवविच्छेदन केले. खडसंगी येथेच अस्वलाला अग्नी देण्यात आला. आजारामुळे या अस्वलाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.