उपलब्ध माहितीनुसार, सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेलात हा वेश्याव्यवसाय केला जात होता. एका पोलीस निरीक्षकासह सहा जणांना अटक करण्यात आली. तर दोन तरुणींची सुटका करण्यात आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आटपाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर दोन महिलांची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे. दरम्यान वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलमधून पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक मायादेवी काळगावे यांनी फिर्याद दिली आहे. कर्नाळ येथील हॉटेलात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यासह पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.