चंद्रपूरमधून होईल ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या विरोधातील शंखनाद
• आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास
• इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- 2025 गुरुवारपासून
• आ. मुनगंटीवार यांनी घेतला आंतरराष्ट्रीय परिषदेचा आढावा
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 13 जानेवारी
16, 17 व 18 जानेवारीला चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- 2025’च्या निमित्ताने चंद्रपूरमधून ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद केला जाईल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
सोमवार, 13 जानेवारीला आ. मुनगंटीवार यांनी तयारीचा आढावा घेतला. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 170 हून अधिक संशोधन पेपर्सचे सादरीकरण, जागतिक हवामान तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण व युवा नेतृत्वाला प्रोत्साहन, आदी उपक्रम होणार आहेत. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासाठी निश्चित महत्त्वपूर्ण योगदान मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. वीस कलमी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आढावा बैठकीला एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव (आभासी पद्धतीने), प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले व अधिकारी उपस्थित होते.
16 जानेवारीला दुपारी 3 वाजता महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातावरण बदलावर चिंतन करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
======
वन अकादमीत होणार आंतरराष्ट्रीय परिषद
चंद्रपूरमधील वन अकादमी येथे तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- 2025’चे आयोजन दिनांक 16 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत होणार आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांनी सिटी युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका यांचे शैक्षणिक सहकार्य लाभले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मँग्रोव्ह फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, इकोलॉजिकल सोसायटी, पुणे आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्या एकत्रित सहकार्याने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.