मोहसीन शेख यांनी पोलीसांत तक्रार केल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला
खोपोली मस्जिद मधील मौलाना यांनी इतर समाजाकडून कुठलीही वस्तू खरेदी करू नका असा फतवा काढला म्हणून केली होती तक्रार
संदेश साळुंके
खोपोली रायगड प्रतिनिधी
9011199333
खोपोली:- धर्मगुरूविरोधातील तक्रारीचा राग मनात ठेवून, तणावाने भरलेल्या खोपोलीत एका व्यापाऱ्यावर थेट जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने शहर हादरले आहे. मोहसीन मोहिद्दीन शेख (वय ४०, व्यवसाय – ट्रान्सपोर्ट, रा. कृष्णानगर, खोपोली) यांच्यावर मौलाना आयुब यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीमुळे नईम मुकरीने प्राणघातक हल्ला केला. या घटनेने कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“धर्मगुरूविरोधात आवाज उठवणे ठरले जीवघेणे”
मौलाना आयुब यांच्या वादग्रस्त शिकवणींविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे मोहसीन शेख यांच्यावर दबाव आणण्यासाठी नईम मुकरीने त्यांना महाराजा मंगल कार्यालयात बोलावले. तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असतानाच, मोहसीन यांनी नकार दिल्याने आरोपीने चिडून फायबर खुर्चीने त्यांना मारहाण केली. इतक्यावर न थांबता, बाहेर येताच लाकडी दांडक्याने प्रचंड संतापाने हल्ला चढवला.
जखमी व्यापारी, संतप्त नागरिक!
या हल्ल्यात मोहसीन यांना पाठीवर, मानेवर, आणि खांद्यावर गंभीर दुखापत झाली असून घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी कसाबसा त्यांची सुटका केली. मात्र, आरोपीने “तुझं आयुष्य संपवीन” अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केले.
खोपोली पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 118(1), 352, 351(2), 49, आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या प्रयत्नात आहेत.
घटनास्थळाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “आता खोपोलीत राहणे सुरक्षित आहे का?” असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
धर्म आणि तणाव समाजावर काय परिणाम?
या घटनेने धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. जर अशा प्रकारांना रोख लावला नाही, तर भविष्यात मोठा संघर्ष उफाळून येऊ शकतो.