भुषण पाटील ठरला २०२५चा ‘लायन्स श्री’
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-हौशी बॉडी बिल्डींग असोसिएशन आणि अलिबाग लायन्स क्लबच्यावतीने राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अलिबाग लायन्स श्री 2025 चा मानकरी ठाणे येथील भुषण पाटील हा ठरला आहे. त्याला किताब देऊन गौरविण्यात आले. तसेच, माजी नगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
अलिबाग समुद्रकिनारी गेल्या दोन दिवसांपासून लायन्स अलिबाग फेस्टीवल सुरु आहे. या फेस्टीवलमध्ये शुक्रवारी (दि.24) सायंकाळी राज्यस्तरिय शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यासह ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई येथील शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या फिटनेस सेंटरसह अलिबाग तालुक्यातील वावे येथील जोशी फिटनेस सेंटरमधील दिपक म्हात्रे, सार्थक घरत, विलास रणदिवे आणि भगवान जाधव या स्पर्धकांनीदेखील स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या गटात झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकांनी यश संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. या स्पर्धेत ठाणे येथील भुषण पाटील यांनी अलिबाग लायन्स श्री 2025 चा किताब पटकावला आहे. त्यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच बॉडी बिल्डींग असोसिएशनचे पदाधिकारी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.