अलिबागकारांनी अनुभवाला संगम भक्ती – शक्तीचा
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त गाज फाऊंडेशन आणि सावी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच संस्कार भारती, रायगड जिल्ह्याच्या सहयोगाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संगम भक्ती – शक्तीचा संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीतमय कार्य्रक्रमातून देशाचा इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे जिवंत चित्रण अलिबागकरांनी अनुभवले. ऐतिहासिक दाखल्यांचा संगीतमय नजराणा सादर करून कलाकारांनी भक्ती आणि शक्तीचा संगम घडवून आणला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सहकार भारतीचे डॉ. उदय जोशी, रघुजी राजे आंग्रे , ॲड.जयंत चेऊलकर, डॉ विशाखा मोडक, प्रदीप नाईक, अँड.प्रसाद पाटील, अँड. मानसी म्हात्रे , अनिल चोपडा आणि अलिबागकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी अहिल्यादेवींच्या समाजसुधारकांवर प्रकाश टाकत त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले.कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली असून, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. या उपक्रमामुळे अहिल्यादेवींच्या विचारांचे संवर्धन होईल व त्यांच्या कार्याचे महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गाज फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि सावी फाऊंडेशनच्या समन्वयकांनी विशेष परिश्रम घेतले .
संगम भक्ती शक्तीचा या संगीतमय कार्यक्रमात कलाकारांनी निश्र्चयाचा महामेरु , शिवरायांची आरती, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, देश हा देव असे माझा , शूर आम्ही सरदार आम्हाला, तारिणी नववसन धारिणी , परवशता पाश दैवते, शतजन्म शोधिताना , अहिल्याबाई पोवाडा , तुझ्याविना संसाराचा, मुंगी उडाली , खोप्यामधी खोपा, रे हिंदबांधवा , जिजाऊंची अंगाई, आई भवानी तुझ्या कृपेने , हिंदू नृसिंहा , आनंदवनभुवनी , जय जय महाराष्ट्र माझा, जयोस्तुते या गाण्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची माने जिंकली.