कोकणातील मीठागरे नामशेष होण्याच्या मार्गावर

33

कोकणातील मीठागरे नामशेष होण्याच्या मार्गावर

मीठागरांच्या जमिनीवर अतिक्रमण, जलप्रदूषण, कामगारांच्या कमतरतेमुळे मीठागरांवर संकट
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-कोकण पट्ट्यातील मीठागरे आणि मीठ व्यावसाय सध्या मोठ्या अडचणीत आहे. पालघर जिल्ह्यातील वसईपासून रायगड जिल्ह्यातील पेण, उरण ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोड्यापर्यंत मीठ उत्पादन घेतले जात होते. मात्र विकासक आणि भूमाफियांचे मीठागरांच्या जमिनीवर होणारे अतिक्रमण, वाढते जलप्रदूषण, उधाणाचे पाणी, कामगारांची कमतरता, इतर भागातून येणारे मीठ आणि शासनाचे दुर्लक्ष यामुळे कोकणातील मीठागरे आणि मीठ व्यावसाय मोठ्या संकटात आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण, उरण आणि काही प्रमाणात अलिबाग या तालुक्यांमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात मिठागरे होती. या मिठागरांवर झालेल्या अतिक्रमणामुळे जेमतेम २० टक्केच मिठागरे शिल्लक राहिली आहेत. मिठागरे ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहेत. मिठागरांची जागा ही सन १९८१ मध्ये बनललेल्या सीआरझेड कायद्यानुसार संरक्षित होती. परंतु २०१७ मध्ये पाणथळ जागा अधिनियमात बदल करत मानवनिर्मित पाणथळ जागा या पाणथळ जागांमधून वगळण्यात आल्या. त्यामुळे विकासकांना व भूमाफीयांना मिठागरांच्या जागेवर अतिक्रमणास मोकळे रान मोकळे झाल्याने या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत आहेत.
सध्या मिठागरांच्या जागेच्या मालकी हक्क कोणाचा हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तो सुटण्याची प्रतिक्षा येथील मीठ उत्पादक करीत आहेत. उरण, पेण, अलिबाग तालुक्यात खाडी किनाऱ्यावर पुर्वी मोठ्याप्रमाणात मीठ पिकवले जात असे. येथील काळ्या मातीप्रमाणे या मिठालाही थोडासा काळपट रंग असे. त्याच्या विशिष्ट चवीमुळे या मिठाला मागणी होती. देशभरातील व्यापारी येथे येऊन मीठ विकत घेऊन जात असत. याचमुळे पेण हे मिठाच्या व्यापाराचे केंद्र होते. या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचे नमक निरिक्षक कार्यालय वाशी फाटा येथे होते. व्यापार कमी झाल्याने या कार्यालयाचाही कारभार कमी झाला आहे. पेण येथील नमक निरीक्षक पियुष कुमार यांनी सांगितले की, पुर्वीप्रमाणे मीठाचे क्षेत्र कमी झालेले आहे, यास अनेक घटक कारणीभूत आहेत. पेणमधील मीठ उत्पादक पट्ट्यातील २३ पैकी फक्त ७ पट्टे आजच्या घडीला सुरु आहेत. मालकी हक्काबाबत येथील मीठ उत्पादक न्यायालयात गेलेले आहेत.
सिंधुदुर्गात पूर्वी मालवण, मिठबाव आदी भागात उत्पादन व्हायचे. आज तेथील मिठागरे बंद पडली आहेत. शिरोडा या एकमेव गावात सध्या मीठ बनविले जाते. मीठ तयार होण्यास फेब्रुवारी मध्यापासून सुरुवात होते. या हंगामात मे अखेरपर्यंत चालतो. वर्षाकाठी सुमारे अडीच हजार टन मीठ उत्पादन होते. यासाठी कामगारांची गरज असते. मात्र आता कामगारांची समस्या मीठ उत्पादकांना भेडसावत आहे.
मिरा-भाईंदर शहर हे खाडी किनारी वसलेले शहर आहे. त्यामुळे या परिसरात अनेक दशकांपासून मीठ शेती करण्यात येते. मात्र गेल्या काही काळापासून वाढत्या शहरीकरणामुळे केवळ १० टक्केच मीठ शेती ही शिल्लक राहिलेली आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील मीठ उत्पादनाला औद्योगिकीकरणाचा फटका बसत आहे. प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे रासायनिक पाणी वसईतील खाडीत आल्याने मासेमारीवर वाईट परिणाम होत आहे. तर अनेक भागात सदरची मासेमारी बंद झाली असतानाच मीठ उत्पादन करणारी मिठागरे आता दूषित होऊ लागल्याने भागातील अनेक मिठागरे आता बंद होण्याच्या स्थितीत आहेत. मीठ प्रदूषित होत असल्याने ते खाण्या योग्य आहे का? तपासण्यासाठी स्थानिक पातळीवर तपासणारी यंत्रणा नाही. त्यामुळे रंग गंधावरून मीठ प्रदूषित झाल्याचे मिठागरातील कामगारांकडून सांगण्यात येत आहे.

चाैकट-
अतिक्रमणास मोकळे रान?
मिठागरांची जागा ही सन १९८१ मध्ये बनललेल्या सीआरझेड कायद्यानुसार संरक्षित होती. परंतु २०१७ मध्ये पाणथळ जागा अधिनियमात बदल करत मानवनिर्मित पाणथळ जागा या पाणथळ जागांमधून वगळण्यात आल्या. त्यामुळे विकासकांना व भूमाफीयांना मिठागरांच्या जागेवर अतिक्रमणास मोकळे रान मोकळे झाल्याने या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत असून मिठागरे नाहीशी होत आहेत.