पोलिस शिपायाने घरीच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

73

पोलिस शिपायाने घरीच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्रिशा राऊत नागपूर जिल्हा प्रतिनिधी मो.
9096817953

नागपूर. नागपूर वाडी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने घरीच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.७) दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा पोलिस विभागात असून या प्रकाराने विभागात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ईव्हीएम केंद्रावर एका पोलिस शिपायाने आत्महत्या केली होती.

हेमराज ज्ञानेश्वर जिचकार (वय ४९, रा. पोलिस क्वार्टर, गिट्टीखदान) असे शिपायाचे नाव आहे. हेमराज हे २००७ मध्ये पोलिस विभागात रुजू झाले होते. तीन वर्षांपासून ते वाडी पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज त्यांची साप्ताहिक सुटी असल्याने ते घरी होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी लग्नाला गेल्या होत्या.

याशिवाय मुलगा मंथन (वय १२), मुलगी नवीन (वय १०) हे दोघेही शाळेत गेले होते. यादरम्यान हेमराज यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांची मुले शाळेतून आल्यावर त्यांनी दार ठोठावले. आतून प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी खिडकीतून आत डोकावले असता, वडील हॉलमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. यावेळी मुलांनी आरडाओरड केल्याने शेजारच्यांनी दार तोडून आत प्रवेश केला.

याबाबत गिट्टीखदान पोलिसांना माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्यासह ताफ्याने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना मेयो रुग्णालयात नेले असता, तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. तपासात त्यांच्याकडे कुठलीही सुसाईड नोट आढळून आली नाही. त्यामुळे नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत, तपास सुरू केला आहे.हेमराज जिचकार यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची चर्चा संपूर्ण विभागात रंगली आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी फेटरी येथे एक प्लॉट खरेदी केला होता. त्यासाठी त्यांना आठ लाख रुपयांची आवश्‍यकता होती. त्यातूनच ते प्रचंड आर्थिक तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्यापही कारण अस्पष्ट असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या दहा दिवसात पोलिस विभागात दुसरी आत्महत्या असून यापूर्वी २८ जानेवारीला नोकरी जाण्याच्या भितीमुळे तणावात आलेल्या पोलिस मुख्यालयातील साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र नानाजी रोहनकर (वय ५४, रा. हुडकेश्‍वर) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या घरी तैनात असलेल्या पोलिस शिपायाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांच्या आत्महत्येमुळे पोलिस विभागात कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
स्वच्छंदी स्वभाव असलेले हेमराज हे ठाण्यात प्रत्येकालाच मोटीव्हेट करायचे. त्याच्या स्वभावामुळे त्यांचेशी कुणीही अबोला राहत नव्हते. मात्र, त्यांनी आत्महत्येला कवटाळले यावर ठाण्यातील अनेकांचा विश्‍वास बसत नसल्याचे समजते.