नगर परिषदांच्या विकासासाठी नक्षा पथदर्शी प्रकल्प महत्वपूर्ण– जिल्हाधिकारी किशन जावळे
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-: नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना स्वतःच्या मालकीची सनद मिळण्यासह नगर परिषदेच्या विकास आराखड्यासाठी नक्षा पथदर्शी प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ मध्य प्रदेशमध्ये झाला असून देशभरातील १५२ नगर परिषदांची यात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आठ नगर परिषदांचा यात समावेश असून, कोकण विभागातून खोपोली आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषदांची निवड करण्यात आली आहे. या पथदर्शी उपक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते
खोपोली नगर परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर,
जिल्हा प्रशासन अधिकारी, श्याम पोशेट्टी, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार अभय चव्हाण, उप अधिक्षक भूमी अभिलेख, खालापूर, प्रमोद जरग,नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. पंकज पाटील, समाधान पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, या प्रकल्पामुळे प्रत्येक नागरिकाला मालकीच्या भूखंडाची अधिकृत सनद मिळणार आहे, जी बँक कर्जासाठी, मोर्गेज तसेच इतर आर्थिक व्यवहारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच या उपक्रमामुळे अतिक्रमण रोखणे शक्य होईल आणि नगर परिषदांच्या विकास आराखड्याच्या तयारीस मदत होईल. या संपूर्ण मोहिमेसाठी सर्व्हे ऑफ इंडिया आणि नागरी स्वराज्य संस्था यांच्या सहाय्याने नगर भूमापन व भू-संदर्भीकरण केले जाणार आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून, नियोजनबद्ध शहरी विकास साधता येणार आहे.
हा प्रकल्प यशस्वी रित्या राबविला गेला, तर नगर परिषद हद्दीतील शहरीकरण नियोजनबद्ध होईल आणि नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर अधिकृत हक्क मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर यांनी तर आभार नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. पंकज पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक, नगर परिषद हद्दीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.