“स्वप्नातील गाव” पुरस्कार प्राप्त पानवे गावात शिवजयंती उत्साहात साजरी!

34

“स्वप्नातील गाव” पुरस्कार प्राप्त पानवे गावात शिवजयंती उत्साहात साजरी!

✍️निखिल सुतार ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133📞

माणगांव :- निसर्गरम्य सावित्री नदीच्या खोऱ्यापासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या म्हसळा तालुक्यातील आदर्शवान पानवे गावात, स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी पानवे गावात उत्साहात साजरी करण्यात आली.
राजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रमुख वक्ते लाभलेले श्री. किरण मोरे सर आणि श्री. परमेश्वर गाडे सर यांनी शिवरायांचा स्वाभिमानी तथा चैतन्यमय इतिहास उपस्थित जनसमुदायासमोर मांडला. अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या महाराजांचे चैतन्यमय विचार डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहिल्यास आपल्या कडे कुणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, असे त्यांनी संबोधित केले.

सदर सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून गट विकास अधिकारी पंचायत समिती म्हसळा श्री. माधव जाधव साहेब, स्वदेशचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. चांगदेव सानप, सरपंच श्री. उमेश पवार, उपसरपंच श्री. श्रीधर तांबे यांची देखील समयोचित भाषणे झाली.

शिवजयंती सोहळ्यास केलटे ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. स्नेहल पिचुर्ले आणि पानवे प्राथमिक शाळेचे शिक्षक खडके गुरुजी समवेत अंगणवाडी सेविका रत्नमाला तांबे, मदतनीस शालिनी चाचले यांची देखील उपस्थिती लाभली.

माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील लहान बालके आजच्या मिरवणुकीतील प्रमुख आकर्षण ठरली.

पानवे गावचे होतकरू कार्यकर्ते श्री. विनोद शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सोहळ्यात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समवेत भगवान गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा स्थानापन्न करून समस्त पानवे पंचक्रोशीत आणि म्हसळा तालुक्यात आदर्श निर्माण केल्याचे उपस्थित मान्यवरांच्या प्रतिक्रियेमधून ऐकावयास मिळाले.

महापुरुषांच्या प्रतिमांच्या उपस्थितीत आपले सर्व महापुरुष एकत्र होते, एकाच विचारधारेवर काम करत होते. त्याप्रमाणे आपणही जाती व धर्मभेद बाजूला ठेवून एकत्र आलो पाहिजे. यामुळेच आपल्या सर्व समस्या मिटतील आणि महापुरुषांना अपेक्षित असा समताधिष्ठित बहुजन समाज निर्माण होईल, असा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला.

शिवजयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. वैभव शिगवण यांनी केले, तर आभार श्री. रामचंद्र पिचुर्ले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, पंचवटी महिला मंडळ यांनी विशेष परीश्रम घेतले.