रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी जमावबंदी आदेश लागू
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-:आगामी सण उत्सवाच्या पार्श्व भूमीवर रायगड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दि. २५ फेब्रुवारीपासून ११ मार्च २०२५ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ३७ (१) (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात खालापुर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगांव, महाड, नागोठणे आणि अलिबाग येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने आहेत. विविध कामगार संघटनांच्या मागण्यांसाठी अचानक संप, निदर्शने आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार, खोपोली पोलीस ठाणे हद्दीत २५ फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शने आणि आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. रोहा पोलीस ठाणे हद्दीत २७ फेब्रुवारी रोजी कोळी महासंघाने सांडपाणी वहिनीवर आंदोलन जाहीर केले आहे.
याशिवाय, २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री, २ मार्च रोजी रमजानचा आरंभ, ८ मार्च रोजी महिला दिन आणि ११ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर हा आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशानुसार, शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगणे, दगडफेक साधने तयार करणे, आक्षेपार्ह घोषणा, चित्रफलकांचे प्रदर्शन आणि पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव यास मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश अंत्यविधी, शासकीय समारंभ आणि अधिकाऱ्यांच्या कर्तव्यापुरते लागू नाही. तथापि, उत्सव, सभा आणि मिरवणुकींसाठी तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असेल.