गरिबांचा फ्रिज ग्रामीण भागात दाखल
आधुनिक युगात ही मडक्याला प्रचंड मागणी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-उष्णतेच्या लाटेने नागरिक बेहाल झाले आहेत. घशाला कोरड पडत असल्याने तहान भगविण्यासाठी अनेकांना थंड पाणी हवे असते. परंतु अनेकजण फ्रिजऐवजी मातीच्या माठातील थंड पाणी पिण्याला पसंती देत आहेत. अलिबागसह ग्रामीण भागात मात्र पारंपरिक माठांऐवजी राजस्थानी माठांना अधिक मागणी असल्याने स्थानिक कुंभार व्यवसायिकांना ऐन हंगामात नुकसान सोसावे लागत आहे. विजेशिवाय किंवा कोणत्याही इंधनाशिवाय गार पाणी तयार होण्याचे साधन म्हणजे पारंपारिक मातीचे माठ. याला गरिबांचा फ्रिज म्हणूनहि ओळखले जाते. शीतल व गारेगार पाण्यासाठी मातीच्या माठांना पसंती असते. उन्हाच्या झळा सुरु झाल्या की, थंडगार पाणी मिळावे म्हणून पारंपारिक माठांना मागणी असते. काहीजण मागच्या वर्षाचा ठेवनीतील माठ बाहेर काढून धुऊनपुसून स्वच्छ करून तो वापरता. काहीजण नविन माठ घेण्यासाठी नजीकच्या कुंभारवाड्यात जातात, मात्र मागील काही वर्षापासून राजस्थानी बनावटीचे तयार व तुलनेत स्वस्त माठ बाजारात दाखल झाले आहेत. राजस्थानी माठ कुठल्याही भटकंतीशिवाय फेरीवाले त्यांच्या माध्यमातून दारात येत असल्याने ते हातोहात विकले जात आहेत. या मुळे पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या माती कारागीरांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. स्थानिकांनी बनवलेल्या माठाला अकरानुसार २०० ते ५०० मोजावे लागतात. राजस्थानी माठ २०० ते ३०० रुपयांना नळासह मिळतात. त्यामुळे ग्राहकांची त्यांना पसंती मिळत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा हि राजस्थान येथून लाल मातीचे माठ ग्रामीण भागात दाखल झाले आहेत.