अल्पवयीन मुलींनसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकास अटक

अल्पवयीन मुलींनसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकास अटक

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994

गडचिरोली :- शाळेतील अल्पवयीन बालिकांशी अश्लिल कृत्य करून शिक्षक वर्गाची प्रतिमा मलीन करणाऱ्या एका मुख्याध्यापका विरोधात लाहेरी पोलीसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रविंद्र उष्टुजी गव्हारे (45 ) असे मुख्याध्यापकाचे नाव असून ते कुक्कामेट्टा येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत.या घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजली असून मुख्याध्यापका विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्हयातील भामरागड तालुक्यातीलजा कुक्कामेट्टा येथील प्राथमिक शाळेत मागील काही दिवसांपासून शाळेच्या मुख्याध्यापकांकडूनच शाळेतील अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील कृत्य केले जात असल्याची घटना समोर आली आहे.बालिकांच्या वागण्यामध्ये दिसून आलेले बदल व भिती पालकांनी हेरल्यामुळे सदरची घटना उघडकीस आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकाच कुटुंबांतील दोन पीडित बालिका शाळेत जाण्यासाठी घाबरत होत्या. हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्याने पालकांनी सदर अल्पवयीन बालिकांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बालिकांनी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र उष्टुजी गव्हारे हे त्यांना वेगवेगळया वेळी शाळेतील ऑफिसमध्ये रजिस्टर घेऊन येण्याच्या बहाण्याने बोलावून इतर कोणीही नसताना त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत असतात व या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मारण्याची व शाळेतून काढण्याची धमकी देत असतात असे सांगितले. पालकांनी गांभीर्य लक्षात घेऊन त्याच शाळेमध्ये शिकणा­या इतर बालिकांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसमक्ष बालिकांकडे चौकशी केली असता, मुख्याध्यापक रविंद्र उष्टुजी गव्हारे यांनी काही इतर मुलींसोबत देखील या प्रकारचे अश्लील कृत्य केले असल्याचे बालिकांनी सांगितले.

सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी उपविभाग भामरागड अंतर्गत येणा­या उप-पोस्टे लाहेरी येथे जाऊन काल दि. 05 मार्च 2025 रोजी तोंडी फिर्याद दिली होती. यावरून लाहेरी पोलीसांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कामेट्टाचे मुख्याध्यापक रविंद्र उष्टुजी गव्हारे, वय-45 वर्षे, रा. ता. भामरागड, जि. गडचिरोली यांचे विरूध्द अप. क्र. 01/2025 कलम 74, 75(2), 351(2)(3) भा.न्या.सं., सहकलम 8, 10, 12, पोक्सो अधि., सहकलम 3 (1) (डब्लु) (i) (ii), 3 (2) (Va) अनु. जाती. जमाती कायदा अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर गुन्हयाच्या संबंधाने आज दि. 06 मार्च 2025 रोजी आरोपी मुख्याध्यापक नामे रविंद्र उष्टुजी गव्हारे, वय-45 वर्षे, रा. ता. भामरागड, जि. गडचिरोली यांना भामरागड पोलीसांनी अटक केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते हे करीत आहेत.