पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सहा एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचं मनोबल प्रचंड उंचावलं असून आता टीम इंडियाने २०१९ मध्ये होणाऱ्या विश्चचषकावर सर्व लक्ष केंद्रीत केलं आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेवूनच रणनीती तयार केली जात असून त्यानुसारच आम्ही मार्गक्रमण करत आहोत, असं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केलं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खिशात घातल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विराट कोहलीने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘प्रत्येक संघ २०१९ चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून योजना तयार करत असतो. आम्हीही विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवूनच डावपेच आखत आहोत,’ असं विराट म्हणाला.
‘विजयानंतर मी खूप खूष आहे. आमच्या सांघिक कामगिरीचं हे फलित होतं. आमची गोलंदाजी, यष्टीरक्षण आणि फलंदाजी चांगली झाली. त्यामुळेच आम्ही ही किमया करू शकलो,’ असं कोहली म्हणाला. या सामन्यात केवळ मालिका गमावण्याचा दबाव होता. कारण दक्षिण आफ्रिकेत मालिका खेळली जात होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या छोट्या छोट्या चुका आम्हाला मालिकेत पुनरागमन करण्यास मदतच करतील हे आम्हाला माहीत होतं, असंही त्याने स्पष्ट केलं.