24 तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन
१ हजार सी–६० कमांडो, २५ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने २४ तासात उभारले नवीन पोलीस स्टेशन
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994
गडचिरोली:- माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा, दुर्गम-अतिदुर्गम भाग असलेला ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधव आज देखील विकासापासून कोसो दूर आहेत, त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज ०९ मार्च २०२५ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत कवंडे या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली. सन २०२४ या वर्षाअखेर ११ डिसेंबर २०२४ रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची व यावर्षी ३० जानेवारी २०२५ रोजी नेनगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती. तसेच मागील ०२ वर्षात एकुण ०७ नवीन पोस्टे/पोमकें स्थापन करण्यात आले. भामरागड पासून २५ किमी., पोस्टे नेलगुंडा पासुन ०६ कि.मी. व छत्तीसगड सिमेला लागूनच असलेल्या अति-दुर्गम कवंडे व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस स्टेशन कवंडे मैलाचा दगड ठरेल.
सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण १ हजार पेक्षा जास्त मनुष्यबळ, १० जेसीबी, ०९ ट्रेलर, ०४ पोकलेन, २५ ट्रक व १० डंपर इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली. तसेच पोलीस स्टेशनची उभारणी करतांना ०२ दिवसांमध्ये पोस्टे नेलगुंडा ते पोस्टे कवंडे पर्यंत ०६ कि.मी.चा कच्चा रस्ता तयार करण्यात आला.
सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, ०६ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लँट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, ०८ सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ०४ अधिकारी व ४१ अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप ११, नवी मुंबईचे ०२ प्लाटुन तसेच सिआरपीएफ ३७ बटा. सी कंपणीचे ०१ असिस्टंट कमांडन्ट व ६९ अंमलदार, विशेष अभियान पथकाचे ०८ पथक (२०० कमांडोज) व क्युएटी सिआरपीएफचे ०२ पथक (५० कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच गडचिरोली पोलीसांनी पोस्टे कवंडे परिसरात असलेले माओवाद्यांचे स्मारक नष्ट केले. तसेच पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन कवंडे हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नववारी साडी, पुरुषांना घमेले, ताडपत्री, स्प्रे-पंप, युवकांसाठी कपडे, ब्लॅन्केट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, फ्रॉक, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट साहित्य, व्हॉलीबॉल साहित्य इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करुन पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले.
सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उपमहानिरिक्षक, केंद्रीय राखीव पोलीस बल, गडचिरोली अजय कुमार शर्मा, गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडण्ट ३७ बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल दाओ इंजीरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी एम.व्हि. सत्यसाई कार्तिक, उप-कमांडण्ट (२ आयसी) ३७ बटा. केंद्रीय राखीव पोलीस बल सुजित कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते व पोलीस स्टेशन कवंडेचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोउपनि. मंदार शिंदे, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
