सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994
गडचिरोली : मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती नागरिकांना सहज, सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मिळणार असून नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या हक्काच्या योजनांची माहिती घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा माहिती कार्यालय व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती गडचिरोली येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे महत्त्व स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा पुढे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांमुळे समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि आर्थिक सशक्तीकरणासाठी मदतीचा हात मिळतो. मात्र, या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही तितकीच महत्त्वाची बाब आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या शिष्यवृत्ती योजना, रोजगार व स्वयंरोजगारासाठीच्या विविध योजना, दिव्यांग कल्याण, सिंचन सुविधा व गृहनिर्माणासाठी देण्यात येणाऱ्या सहाय्य आदी योजनांची माहिती सविस्तर मांडण्यात आली आहे. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा करून विहिरीसाठी चार लाखांपर्यंतची मदत मिळणार आहे. या योजनेची माहितीदेखील येथे देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीसाठीही अशाच लाभाची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पुढील आर्थिक वर्षापासून जिल्हा नियोजनमधील एक टक्का निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले की, योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि हे कार्य या प्रदर्शनाच्या माध्यमातून साध्य होत आहे. शिक्षण, विदेशातील उच्च शिक्षणासाठी सहाय्य, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, रोजगार व स्वयंरोजगारासाठी मदत यांसारख्या अनेक योजनांची माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनांची माहिती करून घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रदर्शनात सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, मागासवर्गीय अनुदानित वसतीगृहांना सहाय्यक अनुदान योजना, मॅट्रिकपूर्व गुणवत्ता शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवकांसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, रमाई आवास योजना, स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, परीक्षा फी सहाय्य योजना आणि उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम यांसारख्या योजनांची माहिती प्रदर्शनात देण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज यांनी केले, तर संचालन जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी केले. गट विकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर आधारित घडीपत्रीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
हे प्रदर्शन 12 मार्चपर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य खुले असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
