मुंबई-गोवा महामार्गाच्या दिरंगाईवर शिमगा आंदोलन! सरकारला जळजळीत इशारा.

मुंबई-गोवा महामार्गाच्या दिरंगाईवर शिमगा आंदोलन! सरकारला जळजळीत इशारा.

✍️निखिल सुतार ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133📞

माणगाव : तब्बल १४ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्णत्वाने कोकणवासीयांचे हाल सुरूच आहेत. या महामार्गाचे काम केवळ कागदोपत्री पुढे सरकत असून, प्रत्यक्षात ठोस काहीच घडत नाही. कोकणवासीय रोज अपघात, वाहतूक कोंडी, आणि खराब रस्त्यांचा सामना करत आहेत, पण सरकार मात्र आश्वासनांची पखरण करत बसले आहे. या अन्यायाविरोधात आणि सरकारला जागे करण्यासाठी जन आक्रोश समिती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संयुक्तपणे शिमगा आंदोलन करत महामार्गावर सरकारच्या निष्क्रियतेची होळी पेटवली.

गुरुवारी, १३ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता माणगाव बसस्थानकावर आंदोलनाला सुरूवात झाली. शेकडो शिवसैनिक, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक महामार्गावर उतरले. “मुंबई-गोवा महामार्ग त्वरित पूर्ण करा”, “कोकणाला विकास हवा, फसवी आश्वासने नाहीत”, “सरकारला झोपेतून उठवू!” अशा आक्रमक घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

महामार्गाच्या दिरंगाईने कोकणवासीयांचा संताप अनावर झाला असून, सरकारला कधी जाग येणार? असा सवाल आंदोलकांनी केला. हा महामार्ग कोकणसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, पर्यटन आणि व्यवसायाच्या संधींसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे, पण सरकारच्या उदासीनतेमुळे हा विकास रोखला जात आहे. कोकणवासीयांना सतत फसवले जात आहे. अनेक वेळा घोषणा झाल्या, निधी मंजूर झाल्याची वक्तव्ये आली, पण प्रत्यक्षात रस्त्याचे काम काहीच पुढे सरकत नाही. कोकणवासीय आता डोळे झाकून बसणार नाहीत, हे सरकारला दाखवून देण्यासाठी हे आंदोलन उभे राहिले आहे.

यामध्ये दक्षिण रायगड संपर्क प्रमुख नागेंद्र उमेश राठोड, शिवसेना जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, युवासेना संपर्क प्रमुख अजिंक्य मोरे, युवासेना रायगड जिल्हा चिटणीस डॉ. अमेय उभारे, महिला जिल्हा संघटक स्वीटी गिरासे, म्हसळा तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, माणगाव शहर प्रमुख अजित तार्लेकर, म्हसळा शहर प्रमुख विशाल सायकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि जनतेचा सहभाग दिसून आला.

या आंदोलनादरम्यान महामार्गावर सरकारच्या निष्क्रियतेची होळी पेटवून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले की, “जर त्वरित महामार्गाचे काम सुरू झाले नाही, तर कोकण बंद पाडून सरकारला सळो की पळो करून सोडू!” सरकारच्या निष्क्रियतेला जनता आता माफ करणार नाही. हा महामार्ग पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच राहील.

सरकार जर आता दुर्लक्ष करत राहिले, तर पुढील आंदोलन अधिक मोठे आणि आक्रमक होईल, असा इशारा देत आंदोलनकर्त्यांनी हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. कोकणवासीयांची सहनशक्ती संपली असून, आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. सरकारने केवळ घोषणा आणि आश्वासनांवर चालणारी नाटकं बंद करून तत्काळ महामार्ग पूर्ण करावा, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा जन आक्रोश समिती आणि शिवसेनेने दिला आहे.