चिमूरच्या पाच युवकांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू

चिमूरच्या पाच युवकांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू

♦️पोहण्याचा बेत जीवावर बेतला

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

नागभीड : 15 मार्च
धूलीवंदनानंतर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 5 युवकांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 15 मार्च रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील घोडाझरी तलावात घडली. जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे व तेजस ठाकरे अशी मृतकांची नावे आहेत. मृत पावलेले युवक एकमेकांचे भाऊ असून, ते चिमूर तालुक्यातील साठगाव-कोलारी येथील आहेत. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
जिल्ह्यातील प्रसिद्ध घोडाझरी तलावात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी चिमूर तालुक्यातील साठगाव-कोलारी येथील जनक गावंडे, यश गावंडे, अनिकेत गावंडे, तेजस गावंडे, तेजस ठाकरे हे पाच युवक आले होते. सर्वांनी पोहण्यासाठी तलावात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जण बुडाले. घटनेची माहिती पोलिस विभागाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बुडालेल्या पाच युवकांचा स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोध सुरू केला. दरम्यान, बुडालेल्या पाचही युवकांचे मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
घटनास्थळी नायब तहसीलदार उमेश कावळे, ठाणेदार कोकोटे, माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, नागभीड नगरपरिषदेचे माजी सभापती सचिन आकुलवार यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
आमदार बंटी भांगडिया यांनी प्रशासनाशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली व रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन दिली. मृतदेहांचे विच्छेदन करून कुटंबियांच्या सुपर्द करण्यात येणार आहे. जिल्हात शांततेत आणि उत्साहात पार पडलेल्या होळी सणावर या घटनेने गालबोट लागले आहे. घटनेचा पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत.