नागरिकांनी पाणी जपून वापरावे : डॉ. भरत बास्टेवाड
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- एप्रिल व मे महिन्यात पाणी स्त्रोतातील पाणी पातळी खालावल्याने जिल्ह्यात काही भागात पाणीटंचाई निर्माण होते. या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज होत असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना सुचविल्य आहेत.
रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभमीवर प्रशासनाने आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतां व्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे पाणी पुरवठा पाइपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख ६८ हजार रुपयांचा पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात १ हजार १६ गावे व वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. आराखड्यात विहिरी खोल करणे गाळ काढणे या कामासाठी ६० लाख १८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर
टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा करणे ३ कोटी ५२ लाख ९२ हजार, नविन विंधन विहिरी १ कोटी ३ लाख ६८ हजार, विंधन विहिरींची दुरुस्ती ४५ लाख ९० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
………………..