माथेरान कडकडीत बंद सुरूच, अनेक राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांचा जाहीर पाठिंबा..!
✍🏻श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान शहर प्रतिनिधी
मो.8793831051
माथेरान :- माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या माथेरान बंद आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थानी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे आजचा पहिला दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला असताना समितीला आशा होती की आजच यावर निर्णय होईल पण प्रशासनाकडून दि.19 मार्च रोजी सभा लावल्यामुळे आजचा पूर्ण दिवसासह बंद हा सुरु असणार आहे.येथील सर्व दुकाने,रेस्टॉरंट,काही हॉटेल्स,लॉजिंग,ई रिक्षा बंद मध्ये सामील झाले होते.काही अश्वचालक वगळता सर्व व्यवहार ठप्प होते.
माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची दिशाभूल,फसवणूक केली जाते.यामुळे माथेरानचा व्यवसाय दोन महिन्यात थोड्याफार प्रमाणात झाला.दरम्यान अश्वचालकांकडून दस्तुरी येथे भरमसाठ दर आणि माथेरान शहरात कमी दर असा अनुभव आलेल्या येथे येऊन गेलेल्या पर्यटकांनी सोशल मीडियाचा आधार घेत.आपला येथे आलेला अनुभव मांडला.यावर अनेकांनी आपल्या तिखट प्रतिक्रिया दिल्यात.माथेरानची होत असलेली बदनामी हे माथेरानचे पर्यटन कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते ते होऊ नये यासाठी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापना करण्यात आली होती.
या समितीमध्ये सर्व पक्षाच्या नेतेमंडळीना घेण्यात आल्यामुळे येथील समाज आणि लॉजिंग संघटना,श्रमिक हातरीक्षा चालक मालक संघटना,ई रिक्षा चालक, हॉटेल्स, दुकानदार यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला होता.सकाळपासून सर्व दुकाने बंद दिसत होती,मिनिट्रेन आणि घोडे वगळता माथेरान पूर्णपणे बंद होते.मंगळवार दि.18 रोजी काही पर्यटक माथेरान मध्ये दाखल झाले होते या बंदच्या काळात पर्यटकांची गैरसोय व्हावी नाही याची देखील समितीच्या वतीने काळजी घेण्यात आली होती. यावेळी काही प्रमाणात घोडे आणि मिनिट्रेन सेवा सुरू असल्याने त्यांना हॉटेल पर्यंत सुखरूप जाता आले.ज्या हॉटेलवाल्यांनी अगोदर बुकिंग
घेतली होती. त्याच पर्यटकांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला जात होता.दरम्यान हा संपूर्ण बंद शांततेत पार पडला.कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मंगळवारी सकाळी श्रीराम चौक येथे सर्व नेते आणि नागरिक यांची चर्चा सुरू झाली त्यावेळेस येथील प्रशासनाकडून पत्र पाठवण्यात आले त्यामध्ये दि.19 रोजी सकाळी 11 वाजता बाळासाहेब ठाकरे सभागृहात सभेचे आयोजन केले असून या सभेमध्ये समस्येचे निराकरण होणार आहे.त्यामुळे आजचा हा बंद सुरूच राहणार असल्याचे या ठिकाणी समितीने जाहीर केले असून दि. 19 तारखेच्या सभेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.
———————————————————————
माथेरानचे पर्यटन वाचविण्यासाठी सर्व राजकीय तेढ विसरून आपण एकत्र येऊन हा लढा देत आहोत.19 तारखेला नगरपालिका सभागृहात सभा आयोजित केली आहे.त्यासभेला अशी एकजूट असली पाहिजे आपली लढाई पर्यटकांची दिशाभूल त्यांची फसवणूक रोखण्यासाठी आहे.या बंदमध्ये पर्यटकांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
अजय सावंत,संयोजक माथेरान पर्यटन बचाव समिती
———————————————————————
माथेरान बंदच्या अनुषंगाने बुधवार दि.19 रोजी बाळासाहेब ठाकरे सभागृहात सभेचे आयोजन केले आहे.कर्जत तालुक्याचे आमदार आणि प्रांताधिकारी या सभेला उपस्थित राहणार आहेत.या सभेमध्ये सकारात्मक निर्णय होण्याची आशा आहे.त्यामुळे पुन्हा माथेरानचे पर्यटन बहरून येईल.आता पर्यटनाबाबत जे दुष्परिणाम झाले आहेत ते पुन्हा होणार नाहीत याची आम्ही दक्षता घेऊ.
सुरेंद्र ठाकूर,अधीक्षक,महसूल विभाग माथेरान