ब्रिटन, ब्राझीलमधील कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे बेफिकीर राहू नका; दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्याचे नियम पाळणे अत्यावश्यक                                  -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

53

ब्रिटन, ब्राझीलमधील कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे बेफिकीर राहू नका;

दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्याचे नियम पाळणे अत्यावश्यक

                                 -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोविडविषयक सादरीकरण

·       राज्यात सुमारे साडेतीन लाखांचे लसीकरण

            मुंबई, दि. 4 : कोविडचे लसीकरण वेगाने सुरु आहे परंतु ब्रिटन, ब्राझीलमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत ते पाहता आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्यावेळी सांगितले. श्री.ठाकरे म्हणाले की समूह प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटीमुळे) मुळे आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे जर आपण मानत असू तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतर देखील युरोपमध्ये संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते हे लक्षात घ्यावे असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

सध्या चीनमधून पसरलेल्या मूळ विषाणूव्यतिरिक्त ब्राझिलियन, आफ्रिकन, युके असे या विषाणूचे तीन आणखी स्ट्रेन असून आपल्याकडे ते पसरू नयेत म्हणून अधिक दक्षता घ्यावी लागेल व जागरूकता बाळगावी लागेल.

दुसरी लाट येऊ नये म्हणून आपण लसीकरण सुरु असले तरी आरोग्याचे नियम पाळत राहिले पाहिजे. कारण केंद्राने जरी चित्रपटगृहे व इतर काही बाबतीत निर्बंध बऱ्यापैकी शिथिल केले असले आणि महाराष्ट्रात देखील आपण आता बऱ्यापैकी व्यवहार सुरु केले असले तरी आपण महाराष्ट्रात सरसकट सगळे निर्बंध उठविणार नसून काळजीपूर्वक पुढे जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

अजूनही परदेशातून येणारे प्रवासी अन्य मार्गाने थेट महाराष्ट्रात पोहचत आहेत, याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे पण आणखी एकदा विनंती करून प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळाच्या शहरातच विलगीकरणात ठेवावे असे सांगणार असल्याचेही श्री.ठाकरे म्हणाले.

दुसऱ्या स्ट्रेनमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक

यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी माहिती देताना सांगितले की, ‘युके’मध्ये २० जानेवारी या एकाच दिवशी १८२० मृत्यू झाले तर ब्राझीलमध्ये दररोज १ हजार मृत्यू होत आहेत. ब्राझीउलमध्ये दररोज ५० हजार रुग्ण आढळत आहेत. जून -जुलैनंतर या देशांत समूह प्रतिकारशक्ती येऊन रुग्णांची संख्या अतिशय कमी झाली होती. पण चार पाच महिन्यानंतर कोरोनाच्या  दुसऱ्या स्ट्रेनचा संसर्ग आढळला जो की ७० टक्के संसर्ग जास्त पसरविण्याची क्षमता असलेला होता. नुकत्याच केलेल्या पाहणीत हा स्ट्रेन केवळ संसर्ग वेगाने पसरविण्यातच नव्हे तर ४० टक्के जास्त मृत्यू यामुळे होऊ शकतात इतका धोकादायक आहे असे आढळल्याचेही डॉ.व्यास यांनी सांगितले.

साडेतीन लाख जणांना लसीकरण

आत्तापर्यंत महाराष्ट्राला १८ लाख २ हजार कोव्हीशिल्ड, तर १ लाख ७० हजार ४०० कोव्हॅक्सिन अशा १९ लाख ७२ हजार ४०० लसी प्राप्त झाल्या आहेत. आजपर्यंत ३ लाख ५४ हजार ६३३ जणांना लस देण्यात आली आहे. त्यात ३ लाख ५१ हजार ४८ कोव्हीशिल्ड तर ३ हजार ५४५ कोव्हॅक्सिन लसी आहेत अशी माहिती देण्यात आली. कालपासून फ्रंटलाईन वर्कर्सना लस देणे सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्रातील मृत्यूदर कमी झाला

राज्याचा मृत्यू दर नोव्हेंबरमध्ये २.२६, डिसेंबर मध्ये १.९६ आणि जानेवारीत १.६३ टक्के इतका झाल्याची तसेच  साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर ४.५१ टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली.

काही जिल्ह्यांवर अधिक लक्ष ठेवणार

कोविडचा आलेख घसरत असला तरी अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा , नंदुरबार, वर्धा, रत्नागिरी, गडचिरोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा वेग जास्त आहे तसेच चाचण्यांचे प्रमाणही कमी आहे त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले.

२० लाख प्रवासी मध्य रेल्वेवर

लोकल सर्वांसाठी सुरु केल्यावर २० लाख प्रवासी मध्य रेल्वेवर तर १४ लाख प्रवासी पश्चिम रेल्वेवर नोंदवले गेले अशी माहिती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी यावेळी दिली. विवाह समारंभ, अंत्यसंस्कार यांना  केंद्र सरकारने १०० जणांची उपस्थितीस परवानगी दिली असली तरी आपल्याकडे अजूनही ५० जणांची उपस्थिती तर अंत्यसंस्कारासाठी अजूनही २० जणांनाच परवानगी आहे त्याचप्रमाणे १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालये ७५ टक्के उपस्थितीच्या अटींशिवाय सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.