गांज्याची विक्री करणारे तरुण पोलिसांच्या जाळ्यात
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव येथे दोन युवक गांजा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने छापा टाकून गांजा विक्री करणाऱ्या दोन युवकांना अटक केल्याची कारवाई सोमवारी नवेगाव येथे करण्यात आली. त्यांच्याकडून २५०० रुपये किमतीचा १२६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नवेगाव रहिवासी सौरभ रॉय (२६) आणि राज चव्हाण (३०) यांचा समावेश आहे.
नवेगाव परिसरातील दोन युवक गांजा विकत असल्याची माहिती गडचिरोली शहर पोलिसांना मिळाली. त्याआधारे शहर पोलिसांच्या पथकाने नवेगाव परिसरात सापळा रचला. यावेळी सौरभ रॉय आणि राज चव्हाण हे दोन युवक संशयास्पद दिसून आले. पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता ते गांजा विकत असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही तरुणांना अटक करून त्यांच्याकडून २ हजार ५०० रुपये किमतीचा १२६ ग्रॅम गांजा आणि ३० हजार रुपये किमतीची एमएच ३३ एए ३९८३ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चैतन्य काटकर व डीबी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.