अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जागतिक ग्राहक दिन वसंत विद्यालयात साजरा

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जागतिक ग्राहक दिन वसंत विद्यालयात साजरा

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा गडचिरोली च्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वसंत विद्यालय गडचिरोली येथे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त वजन व मापं ची प्रदर्शनी व अन्न व औषध प्रशासन ग्राहक प्रबोधनपर व्याख्यान वसंत विद्यालय गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.
जागतिक ग्राहक हक्क दिन हे दरवर्षी 15 मार्च रोजी ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण यांच्या समर्थनाच्या गरजेची आठवण करून देण्यासाठी साजरा केला जातो. सर्व ग्राहकांच्या मूलभूत हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्या हक्कांचा आदर आणि त्यांचे संरक्षण करण्याची संधी देणारा हा दिवस आहे. तसेंच ग्राहकांना त्याच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी विविध उपक्रम ग्राहक पंचायत च्या वतीने देशभरात राबविले जातात.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत द्वारे आयोजित जागतिक ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुरेश तोरेम, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. सुचिता कामडी, मुख्याध्यापिका, वसंत विद्यालय, गडचिरोली व प्रमुख अतिथी रूपचंद फुलझले, जिल्हा निरीक्षक, वैद्य मापन शास्त्र, वजन व मापे विभाग, गडचिरोली तसेच चंद्रकांत पतरंगे, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हा सचिव उदय धकाते व तुकाराम गोडे, नमुना सहाय्यक, अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात वसंत विद्यालयाचे सर्व कर्मचारी रुंद, शिक्षक व शिक्षिका व विद्यार्थी सुद्धा मोठे संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत या चळवळीचे संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी उर्फ ​​नाना हे होते.१९७५ पासून हे ग्राहक पंचायत भारतातील संपूर्ण राज्यामध्ये ग्राहकांच्या हितासाठी काम करत आहे. तसेच या ग्राहक पंचायतीचे व्यवस्थापन हे स्वयंसेवकांचे स्वतंत्र प्रकरण आहे आणि या संस्थेला उपक्रमांचे नियोजन, प्रशासन आणि अंमलबजावणी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे, जेणेकरून ती एक स्वतंत्र, स्वावलंबी आणि स्वयंप्रेरित एनजीओ बनून समुदायाची आणि राष्ट्राची मोठ्या प्रमाणात सेवा करू शकेल. १९७५ पासून अ भा ग्रा प चा असा विश्वास आहे की प्रत्येक माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहक आहे, त्यामुळे ते नेहमीच जात, पंथ आणि धर्माची पर्वा न करता समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा अविरत प्रयत्न करत आहे असे अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पतरंगे यांनी आपल्या प्रास्ताविकात माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी लाभलेले उद्घाटक सुरेश तोरेम अन्न सुरक्षा निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली यांनी आपल्या उद्घाटनिय भाषणात विद्यार्थ्यांमध्ये प्रचलित असलेल्या जंक फूड आणि हेल्दी फूड, सविस्तर माहिती दिली व तसेच अनुभव औषध प्रशासन कशाप्रकारे कार्यकर्ते त्याबद्दल माहिती दिली जाता जाता विद्यार्थ्यांना एखादे खाद्य पदार्थ विकत घेताना व्हेज, नॉन व्हेज हॉलमार्क, फससाई, फूड लायसन्स नंबर,एम आर पी, कन्टेन्ट,क्वांटिटी, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, कंपनी ॲड्रेस ई-मेल अशी भरपूर माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये मार्गदर्शन करून संवाद साधला.
या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने प्रमुख अतिथी रूपचंद फुलझले जिल्हा निरीक्षक, वैद्य मापन शास्त्र, वजन व मापे विभाग, गडचिरोली यांनी संपूर्ण वजन मापे व पोस्टर प्रदर्शनी भरवून प्रमाणित मापे वजने व अप्रमणिक मापे वजने त्याच्याबद्दल प्रत्येकास माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून खेळीमेळीच्या वातावरणात रंगून त्यांनी वजन व मापे द्वारे बाजारपेठेत किंवा दुकानात आपली फसवणूक कशी होते त्याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
ग्राहकाला अर्थव्यवस्थेचा राजा असे संबोधले जात असले तरी त्याला मात्र बाजारपेठेत सतत अडवले जाते, नाडले जाते अन् फसवले तर जातेच जाते. प्रत्येक प्रात्यक्षिक करून आपण कसे फसवले जातो व ही फसवणूक टाळण्यासाठी विशेष लक्ष देऊन मोजमाप करूनच वस्तू घ्यावीत व कुठेही वजन काटा मध्ये काही तपावत आढळल्यास ऑनलाइन तक्रार करावी ग्राहकांचे होणारे शोषण थांबून ग्राहक हिताचे रक्षण करावे अशी मार्गदर्शक सूचना विनंती त्यांनी विद्यार्थ्यास केले.
या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात वसंत विद्यालयातील मुख्यद्यापिका सुचिता कामडी यांनी ग्राहकांचे होणारे शोषण थांबवून त्याच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी 26 डिसेंबर 1986 या दिवसापासून भारत सरकारने ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अमलात आणला, पण केवळ कायदा करून त्यामागील उद्दिष्ट साध्य होत नाही. कायद्याचा धाक, दरारा निर्माण व्हायला हवा असेल तर तो ज्या घटकांसाठी केलेला आहे, तो घटक आधी जागृत असायला हवा. कायद्याचे शस्त्र त्याला पेलता आले पाहिजे.
प्रगतशील भारतातील विद्यार्थ्यांना भारतासारख्या विकसनशील देशात खऱ्या अर्थाने ग्राहक संरक्षण द्यायचे असेल तर ग्राहक प्रशिक्षण, ग्राहक प्रबोधन व ग्राहक जागृती होणे अत्यावश्यक आहे. अनेकविध समस्यांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या ग्राहकांचे प्रश्न अनंत आहेत. ठेकेदाराला सुपूर्द करून प्रश्न सुटत नसतात. बंद, मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको यासारख्या आंदोलनानेही प्रश्नांची स्थायी स्वरूपाची उत्तरे मिळत नाहीत. यासाठी एकमेव पर्याय म्हणजे ग्राहकांना प्रबोधन करणे हे होय त्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे त्यांनी विशेष अभिनंदन केले व दरवर्षी हा कार्यक्रम आपल्या शाळेत व्हावे ही सदिच्छा व्यक्त केली.
ग्राहक संरक्षण कायद्याच्या आधारे काही प्रश्न सोडविता येतीलही, पण त्यालाही मर्यादा आहेच. म्हणून आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच पुढाकार घ्यावा लागतो. स्वतःच स्वतःची शक्ती निर्माण करावी लागते अन् वाढवावीही लागते. त्याचसाठी हवे असते प्रबोधन व जागृती. शोषणमुक्तीचा तोच मूलाधार ! ग्राहक चेतनेतून अपप्रवृत्तींवर अंकुश ठेवता येईल आणि हेच कार्य अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही स्वायत्त संस्था करीत आहे.
या कार्यक्रमाचे संचालन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सदस्य अरुण पोगळे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता व आभार अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हा सचिव उदय धकाते यांनी केले. या कार्यक्रमासाठी वसंत विद्यालय गडचिरोली येथील सर्व कर्मचारी रुंद व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.