जल जीवन मिशन चे अर्धवट कामे आता पूर्ण होणार : 10 कोटींची तरतूद

जल जीवन मिशन चे अर्धवट कामे आता पूर्ण होणार : 10 कोटींची तरतूद

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : प्रत्येक घरी नळाने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशन ही योजना सुरू केली आहे. राज्य व केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जात आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत सुमारे १ हजार २०८ कामे सुरू आहेत. यात काही लघु योजना तर काही गावांमध्ये मोठ्या पाणी पुरवठा योजना आहेत. कंत्राट मिळाल्याबरोबर कंत्राटदारांनी कामाला सुरुवात केली. मात्र मध्यंतरी आलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे जल जीवन मिशनच्या कामांसाठी मिळणारा निधी थांबला होता. काही कंत्राटदारांनी स्वतःच्या बळावर काम पुढे रेटले; मात्र काहींनी कामच बंद ठेवले. शासनाकडून निधी मिळण्याची प्रतीक्षा करीत होते. आता निधी मिळाला असल्याने कामाला गती मिळेल, असा अंदाज आहे.
वर्षभरापासून निधी नसल्याने जल जीवन मिशनची कामे काही प्रमाणात प्रभावित झाली होती. काही कंत्राटदारांनी तर कामेच बंद पाडली होती. मात्र राज्य शासनाने जिल्ह्यातील कामांसाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या कामांना पुन्हा गती मिळेल, अशी आशा आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण १ हजार २०८ कामे हाती घेण्यात आली होती. केवळ ७९ कामे अर्धवट आहेत. अर्धवट कामेही आता पूर्ण होतील.
दुर्गम भागातील काही गावे अतिशय लहान आहेत. केवळ १० ते २० घरांची वस्ती असलेली गावे आहेत. अशा गावात कोट्यवधी रुपयांचा खर्च असलेली मोठी पाणी पुरवठा योजना बांधणे शक्य नाही. अशा गावात दुहेरी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे.
गावातील हातपंपाला पाणी पंप बसविण्यात आला आहे. सदर पंप सौर ऊर्जेवर चालविला जात आहे. पंपाच्या सहाय्याने उपसलेले पाणी जवळच असलेल्या एका जवळपास दोन हजार लिटर क्षमतेच्या पाणी टाकीत टाकले जाते. आवश्यकता असल्यास हातपंपाचेही पाणी वापरता येत आहे.
जिल्ह्यात सुमारे १ हजार २०८ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी सुमारे १ हजार १२९ कामे पूर्ण झाली आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या कामांची गती अधिक आहे.