कॅन्सरविषयी गैरसमज आणि बदनामी: बदलाची गरज
(संशोधक गायत्री राजेंद्र नाईक या क्लिनिकल सायको-ऑन्कोलॉजी या विषयातील विध्यार्थी असून कॅन्सर व कॅन्सरग्रस्त रूग्णांविषयी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे काम करत आहेत.)
मंडळी, आजकाल कॅन्सर हा केवळ एक शारीरिक आजार राहिला नसून तो समाजमानसावर अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रभाव टाकणारा एक गंभीर विषय बनला आहे. दुर्दैवाने भारतात आजही अनेक ठिकाणी कॅन्सर रुग्णांना समाजात इतर घटकांपेक्षा वेगळं समजून दुय्यम स्थान दिलं जातं. तसेच त्यांना दोष दिला जातो किंवा अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी त्यांची उपेक्षा करून टाळलं देखील जातं. आणि म्हणूनच जे लोक कॅन्सरग्रस्त नाहीत, त्यांचा या आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, त्यांच्या भ्रामक समजुती समाजातील कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी कशा प्रकारे अडचणी निर्माण करू शकतात हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडून एक सर्वेक्षण करण्यात आला आणि त्या द्वारे काही निष्कर्ष मांडण्यात आले.
*संशोधन आणि नमुना (Sample Size)*
माझ्या संशोधनात ४०१ सहभागींचा समावेश होता, जे याआधी कधीही कॅन्सरग्रस्त नव्हते. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटांतील, लिंग आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा समावेश केला गेला. या संशोधनाद्वारे मी कॅन्सरविषयी समाजातील समजुती आणि त्यामागची कारणं अभ्यासली. विशेषतः वय, लिंग आणि शिक्षणाच्या आधारे होणारे फरक या पातळ्यांवर काही महत्त्वाचे निष्कर्ष पुढे आले:
*संशोधनातून काय आढळले?*
🔹 तरुण पिढी (१८-२९ वर्षे) – या वयोगटातील लोकं कदाचित भीती किंवा गैरसमजुतींमुळे कॅन्सरविषयी चर्चा टाळते, असे माझ्या पाहण्यात आले.
🔹 पुरुष – काही पुरुषांमध्ये रुग्णाच्या स्वतःच्या चुकीच्या सवयींमुळे कॅन्सर होतो, असा समज अधिक आढळला.
🔹 कमी शिक्षण घेतलेले लोक – अल्पशिक्षित किंवा अशिक्षित लोक कॅन्सरग्रस्त रूग्णांमध्ये अधिक प्रमाणात भेदभाव करतात आणि चुकीच्या समजुती बाळगतात, असे देखील निष्कर्षाअंती मला आढळून आले.
*ही समस्या का गंभीर आहे?*
हो, समाजातील ही मानसिकता कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. अशा चुकीच्या समजुतींमुळे कॅन्सरग्रस्तांना सामाजिक पाठिंबा मिळत नाही, त्यांना मदतीऐवजी न्यूनगंड दिला जातो आणि याच कारणांमुळे काही लोक स्वतःची लवकर तपासणी करणे टाळतात. वास्तविकता अशी आहे की कॅन्सर कोणालाही होऊ शकतो – जीवनशैली, वय किंवा सामाजिक स्तर यावर तो बिलकुल अवलंबून नाही.
*बदल घडवण्यासाठी काय करता येईल?*
शिक्षण आणि खुले संवादच हा बदल मोठ्या प्रमाणात घडवू शकतात.
✔ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कॅन्सरविषयी योग्य माहिती देण्याची गरज आहे.
✔ समाजात कॅन्सरवर उघड चर्चा करण्याची संस्कृती रुजवली पाहिजे.
✔ कॅन्सरग्रस्तांसाठी सहानुभूती आणि पाठिंबा निर्माण करण्यासाठी त्यांचे अनुभव ऐकले जावेत आणि त्यांना स्वीकारले जावे.
लोकहो, जर वरील पद्धतीने आपण कॅन्सरबद्दलच्या भीती आणि गैरसमजुतींना दूर करू शकलो, तरच आपला समाज अधिक प्रगल्भ, समंजस आणि कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी सहानुभूतीशील होईल यात तीळमात्र शंका नाही. चला तर मग! कॅन्सरच्या गैरसमजा विरोधात आपण सर्व जण एकत्र येऊन याविरूद्ध आवाज उठवूया आणि कॅन्सरग्रस्त रूग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा मुक्तहस्ताने स्वीकार करूया! कारण या जीवघेण्या आजाराविषयी समाजात अधिकाधिक जनजागृती करणे हेच खऱ्या अर्थाने कॅन्सरग्रस्तांना मदत करणे आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.