रायगड जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीत वाढ

रायगड जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीत वाढ

७७० पैकी ५४८ गुन्हे उघडकीस ; ८५९ जणांना अटक

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात औद्योगिक प्रगती झपाट्याने होत आहे. त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. मुरुड मधील नागरिकांचे कोट्यावधी रुपये घेऊन परागंदा झालेला रियाज बंदरकर पोलिसांच्या हाती लागला आणि आर्थिक फसवणुकीचा मुद्दा चर्चेला आला. रायगड जिल्ह्यात अशा विविध प्रकरणात ७७० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ५४८ गुन्हे उघडकिस आले असून यामध्ये ८५९ जणांना अटक करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्याला असणारा समुद्रकिनारा आणि रेल्वेने जोडणाऱ्या शहरामुळे येथे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यातच क्रिकेटपटू, हॉलीवुड स्टार आदी बडे हस्तीनी अलिबाग मध्ये बंगले बांधल्याने शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. अलिबाग, कर्जत, खोपोली, खालापूर हे तालुके मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांना जोडणारे असल्याने या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी सेकंड होम ची संकल्पना गेल्या काही वर्षात रुजली असल्याने अनेक जण रायगडमध्ये गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक करत असताना कागदपत्रे नीट तपासून घेणे आवश्यक आहे.
काही वेळा आर्थिक लाभापोटी एकच जमीन दोन-तीन जणांना विकल्याचे उघकीस आले आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम अंतर्गत गेल्या पाच वर्षात १४ गुन्हे दाखल झाले असून सर्व गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये २७जणांना अटक झाली होती.४५ कोटी १२ लाख ८६ हजार ४४८ इतक्या रकमेची फसवणूक झाली असून १९कोटी ६८लाख ६हजार ८६०इतकी रक्कम वसूल झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यासाठी रायगड पोलिसांकडून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
*नोकरीचे प्रलोभन दाखवून लूट*
उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने अनेक युवकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते.त्यामुळे अशा अनेक तरुणांना हेरून काही महाठक नोकरी लावून देतो असे सांगून पैसे उकळतात.नोकरी लागणार या हेतूने पैसे दिले जातात. मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याची लक्षात येते. गेल्या पाच वर्षात रायगड जिल्ह्यात अशा प्रकारची फसवणूक झाल्याचे ४३ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ३२गुण या उघडकीस आणण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. यामध्ये ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास ६ कोटी ५२ लाख २७ हजार ८४४रकमेची फसवणूक झाली असून त्यापैकी २कोटी ४ लाख ९९हजार इतकी रक्कम वसूल झाली आहे.

*दामदुपटीचे आमिष*
पैसे दाम दुप्पट करून देतो असे सांगणारे अनेक फोन कॉल्स नागरिकांनी येतात. शिवाय अनेकदा ओळखीच्या व्यक्तीकडून देखील दाम दुपटीची आमिष दाखवून फसवणूक केली जाते. नांदगाव येथील रियाज बंदरकर यांनी कंपनी स्थापन करून लोकांना अल्प कालावधी श्रीमंत करण्याची लालूच दाखवली. या मोहपाशात अडकलेल्यांनी आपली जमापुंजी गुंतवली आणि डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली. आज रियाज बंदरकर पोलिसांच्या हाती लागला असला तरी आपले पैसे मिळतील की नाही मिळणार असतील तर ते कधी असे अनेक प्रश्न गुंतवणूक दारासमोर उभे आहेत.

“रायगड पोलिसांची स्वतंत्र आर्थिक गुन्हे शाखा कार्यरत आहे. तरुण पिढी फसवणुकीच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील पोलीस महाविद्यालयात जाऊन प्रबोधन करतात.
त्यांच्यासाठी लेक्चर ठेवली जातात आज पर्यंत साधारण सहा हजाराहून अधिक व्याख्याने जिल्ह्यातील महाविद्यालयात झाली आहेत.”
सोमनाथ घाडगे रायगड पोलीस अधीक्षक