वैनगंगा नदीच्या पात्रात काँग्रेस चे ठिय्या आंदोलन
गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्याची मागणी
✍️मीडियावार्ता वृत्तसेवा✍️
मो 8999904994
गडचिरोली : गोसीखुर्द धरणात पाणी अडवल्याने वैनगंगेच्या पाण्याची पातळी खालावली आहे.
पाण्याअभावी उन्हाळी पिकाचे नुकसान होण्याचे मार्गावर असून शेतकरी संकटात सापडले आहेत.
गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्याची मागणी शासन प्रशासनाकडे करण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस व सहपालकमंत्री जयस्वाल यांचे पत्राच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. परंतू अद्यापही कोणतीही पावले उचलण्यात न आल्याने येत्या ५ एप्रिल रोजी चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पात्रात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आज ३१ मार्च रोजी पत्रकार परिषदेतून दिली.
त्याचबरोबर गडचिरोली येथे विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहीत न करता त्यासाठी इतर शासकीय व वनजमिनीचा वापर करावा, चामोर्शी परिसरातील एमआयडीसी करीता प्रस्तावीत अतिरिक्त क्षेत्र स्थापन करण्याकरीता शासनाचे धोरण शेतकरी विरोधी असून शेतकर्यांशी चर्चा केल्याशिवाय जमिन अधिग्रहीत करू नये. वडसा गडचिरोली रेल्वे प्रकल्पाकरीता अधिग्रहीत करण्या येणार्या जमिनधारकांना नवीन दरानुसार मोबदला देण्यात यावा. कोटगल बॅरेज करीता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेतजमिनीचा मोबदला देण्यात यावा, मनरेगा अंतर्गत काम करणार्या मजूरांना थकीत मजूरी तातडीने देण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ब्राम्हणवाडे यांनी दिली.
पत्रकार परिषदेला आमदार रामदास मसराम, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, शहराध्यक्ष सतिश विधाते, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलींद खोब्रागडे, देवाजी सोनटक्के, रजनिकांत मोटघरे, वसंत राऊत आदी उपस्थित होते.