राजिप वेतन घोटाळा,आरोपी महेश मांडवकरची उच्च न्यायालयातून माघार.
उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने वकीलांनी जामिन अर्ज घेतला मागे.
आता वरिष्ठ अधिका-यांच्या सहभागा बद्दल तपास करण्याचा मार्ग मोकळा?
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेच्या वेतन फरकाच्या कोटयवधीच्या घोटाळयातील आरोपी महेश गोपीनाथ मांडवकर यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांच्या वकीलांना मागे घेतला असून आरोपींना अटक करण्याचा पोलीसांचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती या प्रकरणाचा पाठपूरावा करणारे तसेच हे प्रकरण मुंबई आर्थीक गुन्हे अन्वेशण कडे वर्ग करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी दिली आहे.
जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळताना या प्रकरणात इतर अधिका-यांचा सहभाग नाकारता येत नाही, असे महत्वपूर्ण निरीक्षण नांदविले होते. मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात आरोपींना दिलासा देण्यास नकार दिला असल्याने आता या प्रकरणातील वरिष्ठ अधिका-यांचा सहभाग आहे किंवा कसे याबाबत पोलीसांना तपास करता येईल असे मत सावंत यांनी व्यक्त केले आहे. पोलीसांना या प्रकरणात संबीधीत डीडीओ (आहरण व संवितरण अधिकारी) या घोटाळयामध्ये सहभागी आहेत किंवा कसे, आरोपींनी ऑनलाईन लॉगईन आयडी व पासवर्ड कसा प्राप्त केला या सर्व बाबींचा आरोपींकडे तपास करावयाचा असल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळयात यावा अशी मागणी पोलीसांमार्फत जिल्हा सरकारी वकील ॲड.संतोष पवार यांनी जिल्हा न्यायालयात केली होती.
मुंबई उच्च न्यायालयानेही दिलासा देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी अटकपूर्व जामिन अर्ज मागे घेतल्याने आता या आरोपींना पकडण्याचा पोलीसांचा मार्ग मोकळा झाला असून आता या गुन्हयाच्या तपासाला वेग येणार असल्याचे मानले जात आहे.
प्रकरण काय?
रायगड जिल्हा परिषदेत झालेल्या वेतन घोटाळ्याची माहिती खालीलप्रमाणे आहेः
रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात आणि एकात्मिक बाल विकास विभागात कर्मचाऱ्यांनी वेतन फरकाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार केला. कर्मचा-यांनी पगाराच्या बिलांमध्ये कपात किंवा वेतन फरक नसतानाही, तो दाखवून संबंधित रक्कम स्वतःच्या,पत्नीच्या व नातेवाईकांच्या खात्यावर वळवली.
यातील आरोपीः नाना कोरडे (पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ लिपिक) जोतीराम पांडुरंग वरुडे, महेश गोपीनाथ मांडवकर, महिला व बालकल्या मधील लिपीक, जयेष गोपीनाथ मांडवकर, राजेष भगवान नाईक, लता भगवान नाईक हे नातेवाईक आरोपी ज्यांच्या नावावर घोटाळयातील रक्क्कम वळविण्यात आली.
आर्थिक अपहारः
पाणीपुरवठा विभागात 1 कोटी 23 लाख रुपयांचा अपहार.
एकात्मिक बाल विकास विभागात 4 कोटी 12 लाख 34 हजार 779 रुपयांचा अपहार.
एकूण 5 कोटी 35 लाख 771 रुपयांचा अपहार झाला.
: कारवाईः
’ नाना कोरडे याच्यासह संबधीत कर्मचा-यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिले. नाना कोरडे याला पोलीसांना अटक केली.
इतर आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
या घटनेची चौकशी करण्यासाठी 5 सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.