विहिरीचे खोदकाम करताना माती अंगावर पडल्याने ढिगाऱ्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू

विहिरीचे खोदकाम करताना माती अंगावर पडल्याने ढिगाऱ्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथे शेतात विहिरीचे खोदकाम करताना माती अंगावर पडल्याने दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर एक जण थोडक्यात बचावला. ही घटना आज सकाळी 9 च्या दरम्यान घडली. उप्पूला रवी (वय ३०) व कोंडा समय्या (वय ३५, दोघेही रा. जानमपल्ली, ता. सिरोंचा) अशी मृत मजुरांची नावे आहेत.

जानमपल्ली येथे धन्नाडा समक्का यांच्या शेतात विहीर तयार करण्याचे काम सुरु आहे. जवळपास ५० फूट खोल असलेल्या या विहिरीचे १५ रिंगचे बांधकाम झाले आहे. उर्वरित रिंग तयार करण्याकरिता खाली आणखी खोदकाम सुरु होते. त्यासाठी ५ मजूर वर, तर 3 जण खाली माती खोदत होते. परंतु शेत नदीपासून जवळ असल्याने विहिरीत काम करीत असलेल्या उप्पूला रवी, कोंडा समय्या व संपत कोंडा या तिन्ही मजुरांच्या अंगावर खालच्या भागातील सिमेंट काँक्रिटचे तीन ते चार रिंगसह वाळूमिश्रीत ढिगारा कोसळला. यातील संपत कोंडाच्या छातीवरील भाग बाहेर असल्याने विहिरीवरच्या मजुरांनी दोराच्या साह्याने त्याला बाहेर काढले, परंतु उप्पूला रवी व कोंडा समय्या हे दोघेही बराच वेळ दबून राहिले.

उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप नाईक, पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण, तहसीलदार ओनमोरे, नायब तहसीलदार सय्यद आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. गावकरी आणि पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. परंतु बराच वेळ झाला होता. संध्याकाळी उशिरापर्यंत जेसीबीच्या साह्याने दोन्ही मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे जानमपल्ली गावावर शोककळा पसरली आहे.