माथेरान बाजारपेठेतील मेजवानी हॉटेलचा रूम आगीत जळून खाक..
✍🏻 श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान शहर प्रतिनिधी
मो.8793831051
माथेरान :- पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये मुख्य बाजारपेठेतील हॉटेल मेजवानीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लॉजिंग मधील एका रूमाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना आज दि. 9 रोजी श्री राम चौक येथील रहिवासी भागात घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण होते.
हॉटेल मेजवानी या इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लॉजिंग मधील एका रूमला सायं 5 वाजताच्या सुमारास मोठया प्रमाणात आग लागल्याचे रस्त्यावरील नागरिकांच्या लक्षात आले. बघता बघता आजू बाजूचे नागरिक तसेच व्यापारीवर्ग जमा झाला. यावेळी सदर आगीची तीव्रता जास्त प्रमाणात दिसत होती तर हा संपूर्ण परिसर दुकाने,रेस्टॉरंट, त्याचबरोबर लागून असलेली घर तसेच नागरिकांच्या रहदारीने गजबजलेला असल्याने ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. यावेळी क्षणाचाही विलंब न करता जवळच असलेल्या सॅकविल हॉटेलचे मालक यतीश तावडे यांनी आपल्याकडे असलेल्या पाण्याच्या टाकीला मोटारद्वारे पाईप जोडून आपल्या कामगारांच्या मदतीने घटनास्थळापर्यंत पाणी उपलब्ध केले , यावेळी येथे उपस्थित असलेल्या नागरिकांमधील शशी नायक या तरुणांने प्रसंगावधान राखत ज्या रुममध्ये आग लागली होती त्या रूमला असणारी काचेची खिडकी तोडून रूमातील सिलिंग तसेच बेड वरील गादी, दरवाजा, एसी, टी व्ही यावर मोठ्या प्रमाणात पाण्याची फवारणी करत लागलेली संपूर्ण आग आटोक्यात आणत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले व त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या हॉटेलच्या रुममध्ये राहिलेल्या पर्यटकांनी सिलिंग पंखा चालू ठेवून फिरण्यासाठी गेले होते.या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे पंखा तसेच त्यावर असलेल्या ऍक्रेलिक सिलिंग हे प्लास्टिकचे असल्याने आगीने पेट घेतला. बघता बघता ही आग बेड वरील गादी, एसी, टीव्ही, टेबल फॅन तसेच कपाट यावर पसरल्याने अजूनच आगीचा मोठा भडका उडाला व रुमामधून काळा धूर येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.यावेळी हॉटेल मालक प्रमोद नायक तसेच व्यवस्थापक इमरान महापुळे यांनी लागलीच माथेरान नगरपरिषदच्या अग्निशमन दल विभागाला कळवले. मात्र या अग्निशमक वाहनावर प्रशिक्षित चालक तसेच ऑपरेटरच नसल्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत संपूर्ण आग आटोक्यात आणली गेली. यानंतर जवळपास तासा भराने अग्निक्षमक वाहन घटनास्थळावर पोहोचले. माथेरान शहरात गेल्या एक महिन्यातील आगीची ही चौथी घटना असून नादुरुस्त तसेच ऑपरेटर नसलेल्या अग्निशमन वाहनाचा हा खेळ खंडोबा पालिकेकडून असाच सुरू आहे. माथेरान नगरपरिषदेला अशा घटनांचे गांभीर्य नसल्याने पालिका प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. असा आरोप नागरिक करत असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार का ? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.