उन्हाळी सुट्टीतही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांना मिळणार अध्ययनाचे धडे

उन्हाळी सुट्टीतही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांना मिळणार अध्ययनाचे धडे

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये निपूण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी शाळा पातळीवर १ मे ते १५ जून दरम्यान उन्हाळी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा परिषद व प्रथम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थांसाठी हे उन्हाळी शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक विभाग शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे.

या शिबिरांमुळे विद्यार्थ्यांची पायाभूत शैक्षणिक कौशल्ये अधिक सक्षम होऊन पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक तयारी होऊ शकेल, हा उद्देश आहे. उन्हाळी शिबिराच्या आयोजनामध्ये स्थानिक युवक- युवती, माता गटाच्या लीडरमाता, सदस्य माता, विविध सेवाभावी संघटना, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य तसेच अंगणवाडी सेविका इत्यादींचा स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला जाणार आहे. हे उन्हाळी शिबीर स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागाद्वारे राबविण्यात येणार असून, स्वयंसेवकांकडे भाषा व गणित या विषयांवर आवश्यक किमान ज्ञान, कौशल्य व आवड असणे अपेक्षित आहे. या उपक्रमांतर्गत ९ वी ते १२वी मधील इच्छुक विद्यार्थीही लिडर म्हणून सहभागी होऊ शकतात. प्रत्येक गावातून किमान १० ते १५ विद्यार्थ्यांमागे स्वयंसेवक निवडून त्याना ‘प्रथम’ संस्थेच्यावतीने आवश्यक प्रशिक्षण, साहित्य व सातत्यपूर्ण मार्गदर्शन प्रदान करण्यात येईल. प्रत्येक गावातून किमान २ ते ३ स्वयंसेवक यांची निवड शिक्षक व मुख्याध्यापक यांनी करावी. केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांमध्ये स्वयंसेवकांची निवड पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
………………….